नाशिक : एप्रिलच्या मध्यावर उच्चांकी तापमान नोंदवणाऱ्या नाशिकचा पारा दुसऱ्या दिवशी आणखी उंचावत ४०.७ या नव्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. दिवसा उन्हाच्या चटक्यांबरोबर प्रचंड उकाड्याला तोंड द्यावे लागत आहे. वाढत्या तापमानाचा जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे. रात्रीही उकाडा कमी होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तीव्र उन्हामुळे अशक्तपणा, थकवा, शरीर तापणे, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे आढळून येत असल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आठवडाभरापासून ३६ ते ३८ अंशाच्या दरम्यान रेंगाळणाऱ्या तापमानाने सोमवारी हंगामात पहिल्यांदा ४० अंशांचा टप्पा ओलांडला. या दिवशी ४०.४ तापमानाची नोंद झाली. मंगळवारी पारा आणखी उंचावत ४०.७ अंशावर पोहोचल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. उष्णतेची लाट आल्याची स्थिती असून कमालीचा उकाडा जाणवत आहे. आदल्या दिवशी जिल्ह्यातील अनेक भागात विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. बागलाण, कळवण, सुरगाणा, पेठ आदी भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सुरगाणा तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. पिकांचे नुकसान झाले. पेठ तालुक्यात वीज पडून गोपाळ महाले यांची म्हैस मृत्युमुखी पडली. त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी पावसात घरांसह पिकांचे नुकसान झाले. पावसाने उष्मा अधिक वाढल्याचे चित्र आहे. वातावरण शुष्क असून सकाळपासून उन्हाचे चटके जाणवतात. दुपारी घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. शहर आणि ग्रामीण भागात रस्त्यांवर शुकशुकाट पसरत आहे. पुढील दोन दिवस आणखी तापदायक ठरण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य

सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवत असल्याने मनमाडसह अनेक भागात वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाल्याचे पाहावयास मिळत आहेत. वाढत्या तापमानामुळे मनमाडकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. रणरणत्या उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून नागरिक हैराण झाले आहेत. थंडगार पाणी, आईस्क्रिम पार्लर, रसवंती, शीतपेयांची दुकाने, लिंबू पाणी, बर्फाचा गोळा अशा पदार्थांना चांगलीच मागणी वाढली आहे. सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत असून सायंकाळी उशिरापर्यंत झळा लागत आहेत. रात्री देखील घामाच्या धारा निघत आहेत. मनमाडसह अनेक शहरात दुपारी अघोषित संचारबंदी सारखी स्थिती दिसून येते. शरीराला थंडावा मिळावा यासाठी शीतपेयांची मागणी वाढली आहे. उन्हापासून संरक्षणासाठी टोप्या, उपरणे, बागायती रुमाल, गॉगलचा वापर वाढला आहे. तरीही घराबाहेर निघणे अशक्य झाले आहे. वाढते तापमान आरोग्यावर परिणाम करीत आहे.

हेही वाचा…जळगावात अग्नितांडव; रसायन कंपनीत स्फोट; २० पेक्षा अधिक कामगार गंभीर

दवाखान्यांमध्ये गर्दी

तापमान वाढीमुळे मनमाड शहर आणि परिसरात आरोग्याच्या तक्रारीमध्ये कमालीची वाढ झाली आहे. तीव्र उन्हामुळे अशक्तपणा, थकवा, शरीर तापणे, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ ही लक्षणे आढळून येत असल्याने दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली आहे. थंडी, ताप आणि खोकल्याची साथही सुरू आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik sizzles as temperature hits new high of 40 degrees celsius psg