जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाला उभे राहिल्यानंतर आदिवासी पीएच डी. संशोधकांना कधी न्याय मिळणार, असे फलक फडकावत काहींनी घोषणाबाजी केल्यामुळे गोंधळ उडाला. पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. भाषणानंतर शिंदे यांनी संबंधितांचे म्हणणे जाणून घेतले.
मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झाले. मुख्यमंत्री मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहिल्यानंतर हा प्रकार घडला. विशेष व्यक्तींच्या आसन व्यवस्थेमागे नागरिकांसाठी वेगळी आसन व्यवस्था होती. याच भागात चार ते पाच युवक न्याय मिळावा, म्हणून घोषणा देऊ लागले. त्यांच्या हाती पीएच डी. संशोधकांना कधी न्याय मिळणार असा फलक होता. अकस्मात घडलेल्या प्रकाराने काही काळ गोंधळ उडाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी व्यासपीठाकडे आणावे, अशी सूचना केली. नंतर शिंदे यांच्या भाषणाला सुरूवात केली.
व्यासपीठावर आलेल्या एका आंदोलकाशी पालकमंत्री दादा भुसे यांनी चर्चा केली. भाषण झाल्यानंतर शिंदे यांनी संबंधिताचे म्हणणे जाणून घेतले. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित या प्रश्नात लक्ष देतील, असे त्यांनी सांगितले. नंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यास ताब्यात घेतले.