‘स्मार्ट सिटी’ योजनेचा जागर करण्यासोबत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सध्या शहर परिसरात भल्या सकाळपासून प्रश्नावली भरून घेण्याची लगीनघाई सुरू आहे. नाशिक स्मार्ट करण्यासाठी कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी दिलेल्या प्रश्नांमुळे काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात काही आधीपासून झालेल्या कामांचाही अंतर्भाव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेने मूलभूत स्वरूपाची कामे करणे अभिप्रेत आहे. तशा काही कामांचा प्रश्नावलीत समावेश असला तरी वाइननिर्मिती, सुरक्षा अशा काही मुद्दय़ांवर पालिका नेमके काय करणार, असा शहरवासीयांचा प्रश्न आहे. मते जाणून घेताना पालिकेने केवळ वस्तुनिष्ठ प्रश्नांचे उत्तर साचेबद्ध पर्यायांमध्ये देण्यास बाध्य करत सर्वसामान्यांच्या मनातील संकल्पनांना मूठमाती दिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
स्मार्ट सिटी विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटी म्हणून विकसित करावयाच्या २० शहरांत नाशिकचा समावेश व्हावा याकरिता पालिकेची जय्यत तयारी सुरू आहे. या प्रक्रियेत नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून आराखडा तयार करण्याला महत्त्व आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात स्मार्ट सिटीविषयी जनजागृती करून सर्वाना सहभागी करण्यासाठी पालिकेची यंत्रणा धडपड करत आहे. या योजनेत निवड होण्यासाठी काही निकष आधीच निश्चित करून देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने निर्मिलेली प्रश्नावली भरताना वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी स्मार्ट नाशिक योजनेची माहिती देऊन प्रश्नावली भरून घेण्यात येत आहे. नागरिकांच्या सूचनांद्वारे शहर विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित होऊन प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे स्मार्ट वॉक आणि महिलांसाठी मेळावे या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.
या उपक्रमात केवळ दोन मिनिटे का होईना, नागरिकांनी सहभाग नोंदवावा असा प्रयत्न आहे. ही बाब प्रश्नावलीत नमूद केली आहे. आपल्या शहराला अधिक चांगले करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात अनेक संकल्पना असतील. या संकल्पना प्रत्यक्षात योग्य ठिकाणी मांडण्याची संधी प्रश्नावलीने उपलब्ध केल्याचे पालिका सांगते. परंतु प्रत्यक्षात साचेबद्ध कामांमधून केवळ वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे घेतली जात असल्याचे जागरूक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातही एखाद्या विषयावर कोणाकडे काही वेगळी संकल्पना असेल तरी प्रश्नावलीत केवळ उपलब्ध सूचीमधून पर्याय निवडण्याची मुभा आहे. म्हणजे त्यापेक्षा वेगळे काही पालिकेला नको असल्याचे काहींनी प्रश्नावलीचे अवलोकन केल्यावर नमूद केले. मागील काही महिन्यांत नाशिकची वाटचाल गुन्हेगारांचे शहर अशी होण्याच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहे. स्मार्ट सिटी योजनेत नागरिकांची त्यातही प्रामुख्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा निकष आहे. त्यात पालिका नेमके काय करणार, असा प्रश्न असल्याने प्रश्नावलीत त्याला शेवटचे स्थान दिले गेले आहे. पूरपाणी व्यवस्थापन, उपरस्ते व कॉलनी रस्ते, उद्याने व मनोरंजनाची ठिकाणे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आदी कामांवर पालिकेने आधीच कोटय़वधींचा निधी मागील कित्येक वर्षांत खर्च केला आहे. आधीच झालेल्या कामांचे विषयही समाविष्ट केल्यामुळे संभ्रम आहे.
पाच प्रश्नांवर पाच वेगवेगळ्या पर्यायांवर मते जाणून घेतली जात आहे. त्यातील काही प्रश्न हास्यास्पद ठरले आहेत. गोदावरीचे घाट व धार्मिक वारसा याद्वारे पर्यटनाला चालना मिळेल, हा प्रश्न त्याच धाटणीचा. जगाच्या पाठीवर नाशिक धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. अलीकडेच कुंभमेळ्यात जमलेल्या लाखो भाविकांनी त्याची प्रचीती दिली. तरीदेखील पालिका चाचपणी करत आहे. नाशिक हे देशातील विकसित औद्योगिक शहर होऊ शकते, नाशिक भविष्यात देशातील वाइननिर्मिती, निर्यात व पर्यटन केंद्र होईल काय, याबद्दल जनमताचा अंदाज घेतला जात आहे. दोन मिनिटांच्या सहभागाने पालिका नेमके काय साध्य करणार, असा काही नागरिकांना प्रश्न पडला आहे.