महाविद्यालयीन जीवनापासून समाजकार्याची आवड होती. संगणक प्रशिक्षण संस्थेतील मदतीने ब्लड डोनेशन कँप, गड किल्ल्यांची सफाई, वृक्ष लागवड असे उपक्रम राबविले जात होते. देशात सोशल मीडियाचे प्रस्थ वाढत होते. फेसबुकचे जाळे सर्वत्र पसरत होते. या माध्यमाचा वापर काही घटक जातीयवाद, धार्मिकवाद वाढवण्यासाठी करत होते. त्यामुळे ते या माध्यमापासून काही काळ दूर राहिले. काही घटक या माध्यमावर कविता, लेख, आपले विचार मांडायचे, व्यक्त व्हायचे. त्यामुळे या माध्यमाचा सदुपयोग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सुरूवातीला आदिवासी पाड्यांवर काही शिबिरे घेतली. तरुणांचा सहभाग वाढवला. फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही कामे पोहोचवली आणि यातूनच सोशल नेट्वर्किंग फोरमचा नाशिकमध्ये जन्म झाला… या फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड यांची ही कथा.

आज प्रत्येकजण आपले कुटुंब, नोकरी, व्यवसाय, प्रपंचात अडकलेला असतो. पण हे सर्व सांभाळून अनेक जण या फोरमशी जोडले गेले. त्यांचा समाजकार्यात सहभाग वाढला. ज्यांचाकडे वेळ आहे पण पैसा नाही आणि ज्यांचाकडे पैसा आहे पण वेळ नाही असे अनेक जण गायकवाड यांच्या फोरमशी जोडले गेले. वाढदिवसाला काही कुटुंब हजार दोन हजार रुपये सहज खर्च करतात. त्याऐवजी अनाथालय, वृद्धाश्रम, अनेक सामाजिक संस्थांना भेटी देऊन संबंधित घटकांना, संस्थांना आर्थिक मदत करायची संकल्पना गायकवाड यांनी फोरमद्वारे अनेक सहकारी व विद्यार्थ्यांमध्ये रुजविली. त्यांच्या या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. देशभरातील अनेक जण फोरमशी जोडले गेले.

pune video
“चला गोल फिरा..” ही पुणेरी पाटी कशासाठी? Video होतोय व्हायरल
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Loksatta anvyarth Minorities Politics Religious Sentiments Ram Temple
अन्वयार्थ:  कट्टरपंथाला आवरण्यासाठी…
Grandmother dances on pushpa 2 peelings song video viral on social media
काय भारी नाचलीय! ‘पुष्पा-२’ चित्रपटातील गाण्यावर थिरकली आजी, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Woman vulgar dance at tribute meeting video viral on social media
असे लोक येतात तरी कुठून? आजी आजोबांच्या श्रद्धांजली सभेत तरुणीने केली हद्द पार, स्टेजवर गेली अन्…, VIDEO पाहून संताप होईल अनावर
Shop owner advertise poster outside shop for customers goes viral on social media
PHOTO:”कृतज्ञता आयुष्य सुंदर बनवते” दुकान मालकानं ग्राहकांसाठी लावली अशी पाटी की होऊ लागली गर्दी; वाचून तुम्हीही कराल कौतुक
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
Medhansh Trivedi build single seater drone copter
आता चक्क माणसाला घेऊन हवेत उडणार ड्रोन; विद्यार्थ्याचे जबरदस्त इनोव्हेशन पाहून Anand Mahindra ही झाले चकित; म्हणाले…

दिवाळीत फराळ जमा करून ७८ पाड्यांमधील नागरिकांमध्ये ते वितरित करत त्यांच्यासमवेत गायकवाड यांनी सदस्यांसह दिवाळी साजरी करण्याचा वेगळा पायंडा पाडला. या कार्याला प्रतिसाद वाढत गेल्याने गायकवाड यांनी त्यांची संस्था अधिकृतपणे रजिस्टर केली. सोशल नेटवर्किंग साईटवर या समाजकार्याला सुरूवात झाल्यामुळे संस्थेचे नावही ‘सोशल नेटवर्किंग फोरम’ ठेवण्यात आले. नंतर कामाचा ओघ वाढत गेला आणि त्यात आर्थिक हातभार लावणाऱ्यांची संख्या देखील वाढत गेली. आज देशात व परदेशात विखुरलेल्या फोरमच्या सदस्यांची संख्या दीड हजाराहून अधिक आहे.

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य दलातील शहीद हेमराज सिंग व शहीद सुधाकर सिंग या जवानांचे शिर कापले होते. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला. संताप व्यक्त करण्याऐवजी देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांचे आपण कधी रक्षण करणार, असा प्रश्न करत गायकवाड यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीसाठीचे आवाहन करत फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ही पोस्ट वाचून दोन दिवसांत जगभरातून फोरमकडे दीड लाख रुपयांची आर्थिक मदत जमा झाली. यानंतर दहा शहीदांना ५० हजार ते एक लाख रुपयांची आर्थिक मदत फोरमच्या माध्यमातून देण्यात आली.

मराठवाडा तसा कायमस्वरुपी दुष्काळी परिसर. ही बाब लक्षात घेऊन गायकवाड यांनी बीड जिल्ह्यातील राजपिंप्री गावात तीन पाण्याच्या टाक्या आणि टँकरची सोय करून दिली. या ठिकाणी हरणांचे अभयारण्य आहे. त्यांनाही पाण्यासाठी वणवण भटकावे लागायचे. त्यांच्यासाठी सिमेंटच्या पाण्याच्या टाक्या बसवून पाण्याची व्यवस्था करण्यात आली. दुष्काळाचे चटके सर्वत्र सारखेच. शासकीय पातळीवर योजना राबविल्या जातात, पण त्याचा कितपत लाभ होतो हा प्रश्नच आहे. या पार्श्वभूमीवर, फोरमने कायमस्वरुपी दुष्काळ हटविण्यासाठी काय करता येईल यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली. त्यांचे ग्रामीण भागात अभ्यासदौरे सुरू झाले. पाण्याअभावी अनेक गावांची दुर्दशा झाली होती. यावर तोडगा काढण्याचे काम फोरमने हाती घेतले.

पेठ तालुक्यातील टेकडीवर वसलेले गढईपाडा हे गाव. या ठिकाणी १० हजार लिटर पाण्याचा स्टोरेज टँक फोरमच्या माध्यमातून बसवला गेला. तोरणगाव येथे दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना खूप त्रास होत होता. तिथे फोरमने फिल्टरेशन प्लांट बसवला. एक रुपया भरून २० लिटर स्वच्छ पाणी मिळायला लागले.

शेवखंडी, खोटरेपाडा, फणसफड या तीन गावांत पाण्याच्या समस्या होत्या. या ठिकाणी २० हजार लिटर क्षमतेची टाकी बसविली गेली. काही ठिकाणी विहिरीत पाणी नव्हते. काही ठिकाणी विहिर चुकीच्या जागेवर खोदली गेली होती. कमी खर्चात या ठिकाणी कसे काम करता येईल यावर फोरमच्या समितीने चाचपणी केली. पाणी मुबलक राहावे, कधीच आटणार नाही यासाठी गावात काही यशस्वी प्रयोग राबवले. त्या अंतर्गत विहीर खोदण्यात आली. या विहिरीला पाईपलाईन करून संपूर्ण पाणी या टाकीत साठवले. मग हे पाणी संपूर्ण गावाला पाणी पुरवठा व्हावा यासाठी पाणी नसलेल्या विहिरीला या विहिरीतून पाईपलाईनद्वारे जोडून या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. हे काम त्यांनी गावकऱ्यांच्या श्रमदानातून करून घेतले. सरकारी योजना राबवली असती तर लोकांनी त्यात सहभाग नोंदविला नसता. परंतु, श्रमदानातून त्यांनी काम केल्याने या कामाचे महत्त्व त्यांना उमजले व गावातील प्रत्येक समस्येवर त्यांनी एकत्र येत तोडगा काढण्यास सुरूवात केली. फोरमने जवळपास आठ ते दहा गावातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविला.

पाणी टंचाईचा प्रश्न सोडविताना फोरम पर्यावरण रक्षणासाठीही धडपडत आहे. मागील काही वर्षात फोरमने ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवत हजारो रोपांची लागवड करत त्यांचे संगोपनही केले. मविप्र वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर तिच्या मित्रमैत्रिणींनी अडीच लाख रुपये संकलित करून गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. संबंधितांच्या मदतीतून पाच आदिवासी आश्रमशाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम यंत्रणा बसवत आपल्या मैत्रिणीला अनोखी श्रध्दांजली अर्पण केली.

अशीही मदत

तमिळनाडू येथील शांती सुंदरराजनला आंतरराष्ट्रीय पातळीवर ५० मेडल व राष्ट्रीय गोल्ड मेडल मिळाले होते. त्यांना सरकारी नोकरीही दिली गेली. एका स्पर्धेतील चाचणीत त्यांच्या शरीरातील हार्मोन्सवरून संशय घेत त्या महिला नसून, पुरुष असल्याचे सांगत त्यांचाकडील सर्व मेडल्स परत घेण्यात आले. परिणामी, त्यांची नोकरीही गेली. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांच्यावर एका पाठोपाठ एक संकटे कोसळली. या अन्यायाची माहिती समजल्यानंतर गायकवाड यांनी फोरमच्या माध्यमातून लढण्यास सुरूवात केली. तब्बल दीड वर्ष अथक प्रयत्नांती हा लढा यशस्वी झाला. अखेरीस सुंदरराजन यांना त्यांचे सर्व मेडल्स व सरकारी नोकरी परत बहाल करण्यात आली. प्रीतेश बाविस्कर या कुस्ती मिक्स रॅप्लिंग स्पर्धेसाठी निवड झालेला खेळाडू. त्याला स्पर्धेसाठी दिल्ली येथे जायचे होते. प्रवास व वास्तव्याचा खर्च पेलण्याची त्याची क्षमता नव्हती. फेसबुकच्या माध्यमातून त्याने मदतीचे आवाहन केले. त्याचाकडे १० हजार रुपये होते. परंतु, त्याला २० हजार रुपये कमी पडत होते. ही पोस्ट वाचल्यानंतर गायकवाड यांनी एक तासात प्रितेशसाठी २० हजार रुपये जमा करून दिले. मग तो दिल्लीला रवाना झाला. महत्वाची बाब म्हणजे, त्या स्पर्धेत प्रीतेशने सिल्व्हर मेडल मिळवले. प्रमोद गायकवाड यांच्या सोशल नेटवर्किंग फोरममध्ये भारतासह अमेरिका, कतार, दुबई, मस्कत, सिंगापूर, इराक अशा अनेक देशांत फोरमचे सदस्य आहेत. फोरमला अनेक पुरस्कारांनी आजवर गौरवण्यात आले आहे. टीसीएसच्या सहाय्याने सीएसआर फंडाच्या माध्यमातून गायकवाड यांनी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे अनेक प्रोजेक्टस राबवल्याबद्दल त्यांना एक्सलन्स पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते त्यांना मिळाला आहे.

– आशिष कोकरे, नाशिक

Story img Loader