नाशिक – कामगारांना मिळणारे थकबाकीचे हप्ते यापुढेही सुरू ठेवावेत, भविष्य निर्वाह निधीची उचल वेळेवर द्यावी, यांसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने बुधवारी येथील विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे व वार्षिक वेतन वाढीचा दर लागू आहे. असे असताना २०१८ पासूनची थकबाकी प्रलंबित आहे. न्यायालयाने थकबाकी देण्याचा आदेश दिला असतानाही अमलबजावणी होत नसल्याकडे संघटनेचे स्वप्नील गडकरी, गणेश बोडके, योगेश लिंगायत आदींनी लक्ष वेधले. जुलै २०२४ पासून ५३ टक्के महागाई भत्ता लागू झाला. एसटी कामगारांना मात्र तो ४६ टक्के दिला जातो. याशिवाय, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीची थकबाकी एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत प्रलंबित असल्याची बाब आंदोलकांनी निवेदनात मांडली. थकबाकीचे हप्ते फेब्रुवारी २०२५ मध्ये संपले आहेत. त्यामुळे कामगारांचे वेतन कमी होईल. प्रवासी भाड्याची अमलबजावणी पूर्वीप्रमाणे पाच रुपयांच्या पटीत करावी, प्रादेशिक परिवहन विभागाकडून चालकाचा दोष नसताना केली जाणारी दंडात्मक कारवाई रद्द करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. एसटीच्या आर्थिक स्थितीला कामगार जबाबदार नसल्याने कामगारांची प्रलंबित थकबाकी, वाढीव वेतनाचा हप्ता कपात न करता तसाच पुढे चालू ठेवावा, अशी मागणी संबंधितांनी केली.