नाशिक : दिवाळीला सोमवारपासून सुरूवात होणार असून या कालावधीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक राज्य परिवहन विभागाच्या वतीने पुणे, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर, बोरिवली, कसारा मार्गावर अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

पुण्यासाठी ३० हून अधिक, छत्रपती संभाजीनगरसाठी १० आणि धुळ्यासाठी २० हून अधिक फेऱ्या होणार आहेत.. विभागातंर्गत असलेल्या मालेगाव, सटाणा, मनमाड, नांदगाव, इगतपुरी, लासलगांव, कळवण, पेठ, पिंपळगाव या आगारांमार्फतही विविध मार्गावर अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत.

हेही वाचा…छगन भुजबळ यांच्या मालमत्तेत साडेतीन कोटींनी वाढ

मालेगाव, सटाणा, येवलासाठी जादा बससेवेचे नियोजन आहे. महिला सन्मान योजनेतंर्गत महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सवलत दिली जात आहे. तसेच नाशिक-पुणे मार्गावर शिवशाही सेवा प्रकारातील अतिरिक्त फेऱ्या आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या आहेत. प्रवाशांनी या अतिरिक्त फेऱ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. महामंडळाच्या वतीने साधी बस तसेच वातानुकूलित बससेवेत कुठल्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही.