लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नाशिक : जिल्ह्यातील शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने केलेल्या दुर्गशोध अभ्यास मोहिमेतंर्गत शहराजवळील रामशेज किल्ल्याच्या कडेकपारीत एकूण ११ गुहा आढळून आल्या. दुर्मिळ वनस्पती, वनौषधी वृक्षही किल्ले परिसरात असल्याचा दावा संस्थेच्या दुर्ग संवर्धकांनी केला आहे.
दुर्ग संवर्धकांनी तीन गट तयार करून दिवसभरात रामशेज अभ्यास मोहीम पूर्ण केली. यापुढेही या मोहिमेचा दुसरा टप्पा घेण्यात येईल, असे शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा दुर्ग अभ्यासक राम खुर्दळ यांनी सांगितले. संस्था २० वर्षापेक्षा अधिक काळापासून कार्यरत असून जिल्ह्यातील ६० पेक्षा अधिक किल्ल्यांचे संवर्धन, ११ प्राचीन बारव, विरगळी यांचा शोध, पावसाळ्यात वृक्षारोपण, बीजारोपण, उन्हाळ्यात लागणारे वणवे विझविणे असे कार्य करण्यात येत आहे. किल्ले रामशेजवर संस्थेच्या दुर्गसंवर्धकांनी अनेक मोहिमा केल्या आहरेत. रविवारी रामशेजच्या सर्वबाजूने ऐतिहासिक, नैसर्गिक पाऊलखुणा आणि दुर्मिळ जैवविविधतेच्या शोधासाठी अभ्यास मोहीम घेण्यात आली.
हेही वाचा… सत्ताधारी भाजपचे धोरण शेतकरी विरोधी, शरद पवार यांचे टिकास्त्र
या मोहिमेतंर्गत तीन गट करण्यात आले होते. एका गटाने रामशेजच्या कपारींचा शोध घेणे, दुसऱ्याने जलस्त्रोतांचा तर, तिसऱ्याने चहुबाजूने दुर्मिळ वनस्पतींचा शोध घेणे, असे कामाचे वर्गीकरण करण्यात आले होते. या मोहिमेत रामशेजच्या कपारीत ११ गुहा आढळल्या, मध्यभागी विविध घळीत कातीव असंख्य, गोलाकार दगड आढळले. पिंपळ, बाभूळ, काटेसाबर, भोकर, दैवस, अडुळसा, गुर्तुली, उंबर, चिंच, चिलार, हिवर, सिंदल, चाफा, करवंद, रानमोगरा तसेच पश्चिम भागात वनविभागाने लावलेले बांबू आणि सागाची काही झाडे आढळली. बहुतांशी दुर्मिळ वनस्पती औषधी प्रकारातील आहेत. दरम्यान, याठिकाणी दरवर्षी लागणाऱ्या वणव्यामुळे दुर्मिळ वनस्पतींसह मोर, लाहुरी, ससाणा यांच्या वास्तव्यास धोका पोहचत आहे.
हेही वाचा… नाशिकमध्ये माती स्नानाचा उत्साह, प्रतिष्ठितांचा सहभाग
मोहिमेच्या अखेरीस १४ मे रोजी रामशेजच्या माथ्यावर गोमुखी द्वारात छत्रपती शंभूराजे जन्मोत्सव नियोजन बैठक घेण्याचे ठरले. रामशेज दुर्ग अभ्यास-शोध मोहिमेत खुर्दळ, संयोजक समितीचे भूषण औटे, किरण दांडगे, पर्यावरण वृक्षअभ्यासक भारत पिंगळे, दुर्मिळ वनौषधी व वृक्षअभ्यासक शिवाजीभाऊ धोंडगे आदी उपस्थित होते.
रामशेजच्या माथ्यावर दोन दशके आम्ही शिवकार्य गडकोटच्या मोहिमेतंर्गत काम करीत आहोत. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यात यश आले आहे. एकूण ११ गुहा आढळल्या. त्यात सैनिक टेहळणीसाठी बसू शकतील, इतपत जागा आहे. आजूबाजूला असंख्य दगडी गोलाकार गोटे बघता युद्धाप्रसंगी गोफणीतून मारा करण्यासाठी त्यांचा साठा करण्यात आलेला असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी खडकात विविध स्फटिके आढळली. रामशेज किल्ला राज्य संरक्षित स्मारक कधी होणार ? – मनोज अहिरे (ऐतिहासिक वास्तू अभ्यासक समिती)
करवंदे ही वनस्पती काटेरी जाळी तयार करते. मात्र गुर्तुली खोकल्यासाठी गुणकारी आहे. कडूनिंब, चिलार, अडुळसा यांचा वापर दमा ,खोकला, ताप यावर गुणकारी म्हणून होतो. येथे लागणारे वणवे थांबवून वनविभागाने सामाजिक संस्थाना सोबत घेऊन वनौषधी केंद्र तयार करण्याची गरज आहे. – शिवाजी धोंडगे (वनौषधी वृक्षमित्र)