नाशिक : ‘बटेंगे तो कटेंगे’ यावरून भाजपमध्येच दुफळी निर्माण झाली असून भाजपच्या अनेक नेत्यांसह मित्रपक्षांनी त्यास आक्षेप घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राप्तीकर विभाग, सक्तवसुली संचालनालयासह अन्य माध्यमांचा वापर केला. परंतु, त्यांचा पक्ष वैचारिक भूमिकेत दुभंगला गेला, असा दावा राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या खासदार सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांंच्या भूमिकेवर मत मांडले. उपमुख्यमंत्री फडणवीस ‘बटेंगे तो कटेंगे’ संदर्भात एक म्हणतात, तर याच पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि मित्रपक्ष वेगळेच म्हणतात. भाजप या विधानावर विभाजित झाली असल्याकडे सुळे यांनी लक्ष वेधले. शरद पवार हे लोकसभा निवडणूक प्रचारात मुलीकडे आणि आता नातवाकडे लक्ष द्यावे, असे म्हणतात, पण आपण मुलासारखे असूनही आपल्याकडे लक्ष द्या, असे म्हणाले नाही, या अजित पवार यांच्या विधानावर सुळे यांनी टीका केली.

हेही वाचा : “महायुतीचे सरकार विचारधारेवर नव्हे, खोक्यावर बनलेले”, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

शरद पवार यांनी चारवेळा कोणाला उपमुख्यमंत्री केले, मला, रोहितला की योगेंद्रला, असा प्रश्न केला. पवार कुटूंबातील कटूता कमी होणार नसल्याच्या अजित पवार यांच्या विधानावर त्यांनी आपण कुटूंबासाठी लढत नसल्याचे स्पष्ट केले. घरातील विषय घरात. आपण राजकारण कुटूंबासाठी करीत नाही. ही निवडणूक कुटूंबाची नसून वैचारिक लढाई आहे. महाराष्ट्रावरील अन्याय, शेतीमालास हमीभाव नसणे, महिलांवरील वाढते अत्याचार, महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड बोकाळलेला भ्रष्टाचार, याविरोधात आम्ही लढत असल्याचे खासदार सुळे यांनी सूचित केले. महिला नेत्यांची बॅग तपासणी पुरुष कर्मचाऱ्यांकडून होत असल्याच्या प्रश्नावर सुळे यांनी आपली बॅग तपासणी झाल्याचे नमूद केले.