नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातून संशयित महिलेने पाच दिवसाच्या बाळाची चोरी केली. शनिवारी सायंकाळी उशीरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मूळ उत्तर प्रदेशातील परंतु, सध्या बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथे राहणारे अब्दुल खान यांची पत्नी सुमन ही प्रसुतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. २८ डिसेंबर रोजी तिला मुलगा झाला. प्रसुतीनंतर तिला जिल्हा रुग्णालयाच्या प्रसुतीपश्चात कक्षात दाखल करण्यात आले. या दरम्यान एका महिलेने तिच्याशी जवळीक साधली. ती बाळाशी खेळणे, एकत्र जेवण करणे, सुमनची काळजी घेऊ लागली.
शनिवारी सुमन यांना घरी सोडण्यात येणार होते. त्यामुळे रुग्णालयातील कागदपत्रांची पूर्तता करण्यात अब्दुल खान व्यस्त होते. ही संधी साधत सुमन हिला संबंधित महिलेने तुम्ही सामानाची आवरसावर करा, तोपर्यंत बाळाला त्याच्या बाबांकडे देते, असे सांगत तीने बाळाला जवळ घेतले. त्यानंतर ती निघून गेली. खान कक्षात आल्यावर हा प्रकार लक्षात आला.
बाळ चोरीस गेल्याचे समजताच रुग्णालयात खळबळ उडाली. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश आव्हाड, उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातील सीसीटीव्हीची पाहणी करुन महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, महिला रुग्णालयात येताना डोक्याला रुमाल बांधुन येत असल्याने शोध घेण्याचे पोलीसांसमोर आव्हान आहे.