नाशिक: लोकसभा निवडणुकीपेक्षाही अधिक उत्साह…केंद्रांवर लागलेल्या रांगा…शेवटपर्यंत मतदारांना आपलेसे करण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांकडून होत असलेले अर्थपूर्ण व्यवहार…केंद्रात मतदारांसाठी नसलेल्या सुविधा, असे चित्र नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी बुधवारी झालेल्या मतदानावेळी दिसून आले. शहरातील केंद्रांवर मतदारांच्या अभूतपूर्व उत्साहाचे दर्शन घडले.

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, शिंदे गटाचे किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ॲड. महेंद्र भावसार, भाजपशी संबंधित अपक्ष विवेक कोल्हे यांच्यासह २१ जणांचे निवडणुकीतील भविष्य मतपेटीत बंद झाले. या मतदारसंघाचा प्रचार साडी, नथ, सफारी कापड, पैसे वाटपाच्या तक्रारींमुळे गाजला.

हेही वाचा : केंद्रापर्यंत प्रलोभने अन् मतदानासाठी रांगा; केंद्राबाहेर पैसे वाटपाने नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक वादात

बुधवारी सकाळपासूनच शहरातील केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. वेळखाऊ मतदान प्रक्रियेमुळे रांगेतील मतदार संथपणे पुढे सरकत होते. रांगेतच तासापेक्षा अधिक वेळ जात होता. बी. डी. भालेकर हायस्कुल मतदान केंद्रात मतदारांना असुविधांना तोंड द्यावे लागले. केंद्रातही पिण्याचे पाणी, पुरेशी हवा, उजेड नव्हता. मतदान सुरु असतानाही केंद्राबाहेर काही जण पैसे वाटप करीत असल्याची तक्रार करण्यात आल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. काही कार्यकर्त्यांनी एक-दोन जणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

मतदान केंद्राबाहेर उमेदवारांचे कक्ष उभारण्यात आले होते. कक्षातील लोकांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांना पिण्यासाठी शुध्द पाणी देण्यात येत होते. केंद्राबाहेर उमेदवारांचे समर्थक, पदाधिकारी, तसेच मतदारांच्या वाहनांमुळे बऱ्याच ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला.

हेही वाचा : विद्यार्थिनीच्या मृत्युनंतर दिवसभर शाळा बंद, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे आंदोलन

मतदारांच्या श्रीमंतीचे दर्शन

सकाळपासून बी. डी. भालेकर हायस्कुल, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय तसेच मखमलाबाद येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. मतदानासाठी आलेल्या शिक्षकांच्या श्रीमंतीचे यावेळी दर्शन घडले. महागड्या गाड्यांमधून अनेक शिक्षक आले होते. काही ठिकाणी मतदारांसाठी खास वाहनव्यवस्था करण्यात आली होती.

हेही वाचा : विवाहितेची बाळासह शेततळ्यात आत्महत्या

मतदानासाठी विलंब

शिक्षक मतदारसंघात इव्हीएम यंत्राचा वापर न करता मतपत्रिकेवर पसंती क्रमानुसार मतदान करावे लागत होते. यामुळे मतदानास विलंब होत होता. त्यामुळे मतदारांच्या रांगा वाढत होत्या. केंद्राबाहेर उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधला. केंद्रात जाऊन मतदानाचा वेग वाढवा, अशा सूचनाही उमेदवारांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या.