नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या विरोधात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मतदार यादीत समावेश केल्याचा आरोप झाल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने मतदार यादीची फेरपडताळणी सुरू केली आहे. जिल्ह्यात २५ हजार ३०२ शिक्षक मतदार असून पडताळणीचे हे काम मंगळवारी सायंकाळपर्यंत पूर्णत्वास नेण्यात येणार आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी बुधवारी मतदान होत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बनावट शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. शिक्षक मेळाव्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असे बनावट मतदार शोधून काढावेत, संबंधितांसह त्यांची बनावट नोंदणी करणाऱ्या संस्था व नेत्यांवर खटले दाखल करण्याची सूचना पदाधिकाऱ्यांना केली. नाशिक शिक्षक मतदारसंघात एकूण ६९ हजार ३६८ मतदार आहेत. यातील २५ हजार ३०२ नाशिक जिल्ह्यातील आहेत. दोन प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार स्थानिक पातळीवर आहेत. या मतदारसंघात मतदार नोंदणीची विहित प्रक्रिया असते. अर्ज क्रमांक १९ भरावा लागतो. संबंधित व्यक्तीने मागील सहा वर्षातील तीन वर्ष शिक्षक म्हणून काम केलेले पाहिजे. मुख्याध्यापक संबंधिताला तसा दाखला देतात. त्याची निवडणूक यंत्रणा गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून खात्री करून घेते. त्यानंतर प्रांताधिकारी अर्थात सहायक मतदार नोंदणी अधिकारी निर्णय घेतो. या प्रक्रियेतून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येते.

हेही वाचा…बांबूच्या झोळीतून नेतांना रस्त्यातच प्रसुती; नंदुरबार जिल्ह्यात रस्त्याअभावी आदिवासी बांधवांना मरणयातना

बनावट शिक्षक नोंदणीवर आक्षेप घेतला गेल्याने ज्या मुख्याध्यापकांनी आपापल्या शिक्षकांच्या नावावर शिक्कामोर्तब केले, त्यांना याद्या पुन्हा पडताळण्यास सांगण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व मतदारांची फेरपडताळणी सुरू केली. या याद्यांवर स्वाक्षरी करणाऱ्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनाही या याद्यांची पडताळणी करावी लागणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर राजकीय पक्षांना त्यावर दावे व आक्षेप नोंदविण्याची संधी दिली जाते. प्रारुप यादी प्रसिध्द झाल्यानंतर काही दावे व आक्षेप घेतले गेले. परंतु, त्यांची संख्या फार नव्हती. फारसे मोठे आक्षेपही नव्हते. विहित निकषानुसार मतदार नोंदणीची प्रक्रिया पार पडली. फेरपडताळणीत काही शिक्षकेतर कर्मचारी मतदार यादीत समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आल्यास, ज्यांनी संबंधितांना मदत केली, असे सर्व कारवाईस पात्र ठरतील, असे यंत्रणेकडून सांगितले जात आहे.