साधारणत: महिनाभराच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा थंडीची लाट आली असून बुधवारी सकाळी पारा ५.८ अंशापर्यंत खाली घसरल्याने हंगामात सलग दुसऱ्यांदा हुडहुडीचा आनंद शहरवासीयांना मिळत आहे. उत्तरेकडील वातावरणाचा प्रभाव नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या तापमानावर झाला आहे. त्यातच आकाश निरभ्र असल्याने पुढील एक ते दोन दिवस ही स्थिती कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षांना तडे जाण्याची शक्यता बळावल्याने रात्रभर शेकोटय़ा पेटवत उत्पादकांनी बागा थंडीपासून वाचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
यंदाच्या हंगामात दिवाळीनंतर गारव्याचे अस्तित्व अधोरेखित झाले असले तरी थंडीची लाट आली ती डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात. २५ डिसेंबर रोजी ५.४ अंश या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. सलग तीन-चार दिवस नाशिक गारठले होते. त्यानंतर उंचावलेला पारा गेल्या दोन दिवसात वेगाने कमी झाला आहे. मंगळवारी ८.७ अंशावर असलेले तापमान बुधवारी सकाळी ५.८ अंशावर येऊन पोहोचले. तापमानात अचानक बदल झाल्यामुळे सर्वाना हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. वातावरणात गारवा रहात असल्याने दिवसभर उबदार कपडे परिधान करणे भाग पडले. कडाक्याच्या थंडीने भल्या पहाटे ‘मॉर्निग वॉक’साठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांपासून ते सकाळी शाळा व महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी अन् सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वाना उबदार कपडय़ांचा आधार घ्यावा लागत आहे. भल्या सकाळी बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे.उत्तरेकडील भागात सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्या भागातून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्राच्या वातावरणावर पडतो. त्यात सध्या आकाश निरभ्र असल्याने आणि आद्र्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे नाशिकमध्ये थंडीची लाट आल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. कधीकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक किमान हिवाळ्यात आपली ही ओळख टिकवून आहे. सर्वसाधारपणे हिवाळ्यात जानेवारी वा फेब्रुवारी महिन्यात नाशिकचे तापमान चार ते पाच अंशापर्यंत खाली येते. यंदा महिनाभर आधीच म्हणजे डिसेंबरमध्ये ही पातळी गाठली गेली होती. तेव्हा सलग काही दिवस थंडीचा आस्वाद घेणाऱ्या नाशिकमध्ये नववर्षांत नेमके कसे चित्र राहणार याबद्दल असणारी उत्सुकता या निमित्ताने शमली आहे. थंडीची ही लाट पुढील एक ते दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.थंडीची लाट आल्यामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. या वातावरणात द्राक्ष घडात पाणी साचून मण्यांना तडे जाण्याची शक्यता असते. थंडीपासून बचावासाठी द्राक्ष बागांवर औषधांची अतिरिक्त फवारणी करावी लागू नये म्हणून उत्पादक धडपड करत आहे. जिल्ह्यातील निफाड, नाशिक, दिंडोरी आदी तालुके द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहेत. या पट्टय़ात शेतकऱ्यांना रात्र अक्षरश: जागून काढावी लागते. मध्यरात्री तीन वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. बागेत काही विशिष्ट अंतरावर ठिकठिकाणी शेकोटी पेटवून द्राक्ष घडांसाठी उबदार वातावरण तयार केले जात असल्याचे उत्पादकांनी सांगितले.

Story img Loader