टळटळीत ऊन आणि कमालीच्या उकाड्यात दिवसागणिक वाढ होत असून बुधवारी तापमानाने हंगामात प्रथमच ४० अंशाचा टप्पा पार करीत ४०.२ अंशाची पातळी गाठली. दोन दिवसात तापमानात तीन अंशांनी वाढ झाली आहे. हवामान विभागाने तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज वर्तविला असल्याने या एकंदर स्थितीत उष्णतेची लाट येण्याची धास्ती व्यक्त होत आहे. अकस्मात बदललेल्या वातावरणात नागरिकांनी उष्माघातापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
हेही वाचा >>> नाशिक : चोरीच्या दुचाकींची अल्प किंमतीत शेतकऱ्यांना विक्री; १९ मोटारसायकली हस्तगत
एरवी दरवर्षी एप्रिलपासून टळटळीत उन्हाचे चटके बसतात. तापमानाची पातळी तेव्हाच ४० अंशावर जाते. यंदा काहिशी उशिरा म्हणजे मे महिन्यात ही पातळी गाठली गेली. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ४१.१ या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. मागील पाच वर्षात २०१९ मध्ये सर्वाधिक ४२.८ अंश तापमानाची नोंद झालेली आहे. त्याचा विचार करता यंदा पारा किती वर जाणार याबाबत धास्ती पसरली आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट व ढगाळ वातावरण राहिले. त्यामुळे उन्हाची तीव्रता तितकी जाणवली नव्हती. आता मात्र वातावरण पूर्णत: बदलले आहे. अगदी नऊ- दहा वाजेपासून उन्हाची तीव्रता जाणवू लागते. दुपारी बारापासून रस्ते, बाजारपेठेतील वर्दळ काहिशी कमी होते.
हेही वाचा >>> सत्तासंघर्षाच्या निकालाविषयी मुख्यमंत्र्यांकडून सर्वांना शुभेच्छा
उन्हाच्या झळा इतक्या तीव्र आहे की, थोडावेळ या वातावरणात भ्रमंती केल्यावर डोकेदुखी, चक्कर आल्यासारखे जाणवते. दिवस-रात्र कमालीचा उकाडा जाणवत आहे. त्यात गंगापूर रस्त्यासह काही भागात काही तास वीज गायब झाल्यामुळे अडचणीत भर पडली. इतरत्र अधुनमधून विजेचा लपंडाव घालमेल वाढवित आहे. ग्रामीण भागात यापेक्षा वेगळे चित्र नाही. मनमाडसह इतरत्र तापमानाने ४० अंशाचा टप्पा गाठला आहे. रणरणत्या उन्हामुळे प्रमुख रस्त्यांवरील वर्दळ कमालीची घटली. हवेतील आर्द्रता कमी झाल्याने उकाड्यात चांगलीच वाढ झाली. मनमाडमध्ये दरवर्षी मार्च ते मे या महिन्यात पारा ४० ते ४१ अंशांवर राहतो. यावर्षी उन्हाळ्यातील पहिले दोन महिने उन्हाचा तडाखा जाणवला नाही. त्यामुळे सध्या अकस्मात वाढलेल्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. यातून दिलासा मिळवण्यासाठी रसवंती गृह, शीतपेय, मसाले ताक, आइस्क्रिम आदी विक्रेत्यांच्या दुकानांवर धाव घेतली जात आहे.