नाशिक – मनमाड रेल्वे पोलिसांना एक बालिका सापडली असून तिला आधाराश्रमात दाखल करण्यात आले आहे. या बालिकेच्या पालकांनी ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर महिला विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवित असतानाही अनेकांना मुली नकोशा वाटतात. मनमाड लोहमार्ग पोलिसांना नऊ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर- लिंगमपल्ली-मुंबई देवगिरी एक्सप्रेसमधील शौचालयात नऊ महिने सात दिवसांची बालिका आढळली. रेल्वे पोलिसांनी या बालिकेच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कुणीही मिळून न आल्याने बालिकेचे सिद्धी असे नामकरण करुन बालकल्याण समितीच्या आदेशान्वये नाशिक येथील घारपुरे घाट येथील आधाराश्रमात तिला दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा – नाशिक : तलाव नुतनीकरणाचा संथपणा महिलांसाठी त्रासदायक, मर्यादित सत्रांमुळे नाराजीत भर
बालिकेच्या सुरक्षित पालकत्वासाठी पालकांनी पुढे येऊन सिद्धीची ओळख पटवावी, असे आवाहन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी ०२५३-२५८०३०९ २९५०३०९ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष नाशिक, समाजकल्याण आवार, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक ०२५३-२२३६३६८ या ठिकाणी संपर्क साधावा. ३० दिवसांच्या आत बालिकेवर दावा करण्यास कोणी न आल्यास पालक नसल्याचे गृहीत धरून पुढील पुनर्वसनाचा विचार करण्यात येणार असल्याचेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाणे यांनी नमूद केले आहे