नाशिक – महायुती सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत विविध योजनांची घोषणाबाजी करुन जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला. तिजोरीत पैसे आहेत की नाही, याची चिंता न करता मंत्रिमंडळ बैठकीत केवळ घोषणाबाजी केली गेली. त्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद नसल्याने त्यांची अंमलबजावणी होणार नसल्याचे त्यांनी सूचित केले.
काँग्रेसतर्फे मंगळवारी इगतपुरी तालुक्यात निर्धार मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात सहभागी होण्याआधी चेनिथला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महायुती सरकारच्या जुमलेबाजीवर जनता विश्वास ठेवणार नाही. महायुती सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात, शेतकरी, बेरोजगार आणि आदिवासींचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरली आहे, अशी टीका त्यांनी केली.
हेही वाचा – इगतपुरीत काँग्रेस सोडणारे पराभूत हा इतिहास, नाना पटोले यांचा दावा
हेही वाचा – नाशिक : आचारसंहितेमुळे फलकबाजीला लगाम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे २८८ पैकी जवळपास २२६ जागांवरील जागावाटप अंतिम झाल्याचे सांगितले. उर्वरित जागांचा प्रश्न दोन दिवसांत तिन्ही पक्षांचे नेते वाटाघाटीने सोडवतील. कोणत्याही जागेवरून आमच्यात वाद नाही. महाविकास आघाडीत कोणी लहान भाऊ वा मोठा भाऊ नाही. महाराष्ट्र वाचविणे हा आमचा धर्म असून त्यासाठी सर्व मिळून लढणार आहोत. भाजप केंद्रातील सत्तेचा कसा गैरवापर करते ते विधान परिषदेवर आमदार नियुक्तीने उघड झाले आहे. महाविकास आघाडी सरकारने १२ जणांची यादी दिल्यानंतरही तत्कालीन राज्यपालांनी नियुक्ती होऊ दिली नव्हती. महायुती सरकारने प्रमुख शहरातील पशूसंवर्धन विभागाच्या १२ मोक्याच्या जागा विकायला काढल्याचा आरोप पटोले यांनी केला.