नाशिक : शहरात तीन दिवसात हिट अँड रनच्या तीन घटना घडल्या असून त्यात दोन महिलांसह एका युवकाला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात संशयितांविरूध्द गुन्हे नोंदविण्यात आले असून एका चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

मंगळवारी रात्री नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सरफुद्दीन सैनुद्दीन अन्सारी (२२, रा. संजीवनगर, अंबड) हा काही कामानिमित्त थांबला होता. शहरातील पपया नर्सरीसमोरील रस्त्यावर तो उभा असतांना त्याला भरधाव कारची धडक बसली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जवळच्या पेट्रोल पंपाचे तुषार मरसाळे यांनी अन्सारी यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना गंगापूर रस्त्याजवळील बारदान फाटा ते ध्रुवनगर रस्त्यावरील रानवारा हॉटेलजवळ घडली. एका वाहनाची धडक बसल्याने महिलेचा मृत्यू झाला. अर्चना शिंदे (३१, रा. हनुमान नगर, मोतीवाला कॉलेजजवळ, गंगापूर रोड, नाशिक) असे महिलेचे नाव आहे. अर्चना या पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या वाहनाची त्यांना धडक बसली.

हेही वाचा…विहिरीच्या वादातून वृध्दाला भावाच्या कुटूंबाने जिवंत जाळले

अपघातानंतर वाहन चालक पळून गेला. गंगापूर पोलिसांना माहिती प्राप्त होताच वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे तसेच अन्य सहकाऱ्यांनी जखमी अर्चना यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गुन्हे शोध पथकाने वाहनाची माहिती घेत देवचंद तिदमे (५१, रा. ध्रुवनगर, नाशिक) यास ताब्यात घेतले. तिदमे याने मद्य घेतलेले होते. त्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करुन रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्याच्याविरुध्द गंगापूररोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा…जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याची हत्या

तिसरी घटना रविवारी घडली होती. नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात डॉन बॉस्को शाळा ते क्रोमा चौक दरम्यान भरधाव वाहनाची धडक बसल्याने ४९ वर्षाच्या पादचारी महिलेचा मृत्यू झाला. निधी वारे (४९, गिरीराज अपार्टमेंट, कॉलेजरोड) असे मृत महिलेचे नाव आहे. वारे या सायंकाळी भाजीपाला खरेदीसाठी गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून पायी घराकडे परतत असताना हा अपघात झाला. क्रोमा दालन ते डॉन बॉस्को शाळा दरम्यानच्या रस्त्याने त्या जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मालवाहू टेम्पोची त्यांना जोरदार धडक बसली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक आपल्या वाहनासह पसार झाला. चालकाविरूध्द गंगापूररोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.