नाशिक – महापालिकेच्या वॉटरग्रेस या कंपनीचा कंत्राटी सफाई कर्मचारी आकाश उर्फ शुभम धनवटे याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांसह एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून संशयितांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात भाजपचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे याचेही नाव आले आहे.

अथर्व दाते (२०, रा.घारपुरे घाट), अभय तुरे (१९, रा. रविवार पेठ) आणि मकरंद देशमुख अशी कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांचा अल्पवयीन साथीदार पोलिसांच्या ताब्यात आहे. पंडित कॉलनीतील बालगणेश उद्यान परिसरात मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास धनवटे याच्यावर धारदार शस्त्राने दुचाकीस्वार टोळक्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी धनवटेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचा भाऊ मकरंद उर्फ सोमा धनवटे (रा. घारपुरे घाट) याने दिलेल्या तक्रारीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित व्यंकटेश मोरे, मकरंद देशमुख, अथर्व दाते, अभय तुरे आदींसह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेनंतर पेठ परिसर पिंजून काढत अवघ्या काही तासात संशयित अथर्व दाते, अभय तुरे आणि अल्पवयीन मुलासह मकरंद देशमुख याच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा – नंदुरबार जिल्ह्यातील जंगलातून येणाऱ्या आवाजाचे गूढ काय?

विसर्जन मिरवणुकीतील वाद कारणीभूत

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत सराईत अथर्व दाते आणि आकाश धनवटे यांच्यात वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. २०२१ मध्ये दोघामंध्ये हाणामारी झाली होती. हा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने प्रकरण मागे घेण्यासाठी संशयित व्यंकटेश मोरेसह इतरांकडून धनवटेवर दबाव टाकला जात होता, असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असता त्यात मोरे दिसून येत नसल्याचे सांगितले. कोठडीत असलेल्या संशयितांच्या चौकशीनंतर मोरेच्या अटकेचा निर्णय होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेस राजकीय वळण मिळाल्याने पोलिसांच्या भूमिकेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा – नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा

व्यंकटेश मोरेविरुद्ध याआधीही गुन्हे

व्यंकटेश मोरे याच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी कुख्यात गुंड सलीम कुत्ताबरोबर पार्टी केल्याचे प्रकरण भाजपने उजेडात आणले असता ही पार्टी भाजप माथाडी कामगार आघाडीचा प्रमुख मोरे याने आयोजित केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. भाजपने हे आरोप फेटाळले होते.