नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बुधवारपासून नाशिक ते बोरीवली दरम्यान इलेक्ट्रिक बससेवा सुरू होणार आहे. मंगळवारी ठाणे येथे विविध मार्गावर इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येत आहे. बुधवारपासून नाशिकमधून ही सेवा सुरू होईल. नाशिक-बोरीवली दरम्यान धावणारी बस ३५ आसनी असणार आहे. सद्यस्थितीत नाशिक-पुणे महामार्गावर इलेक्ट्रिक बससेवा सुरू आहे. तिचा हळूहळू इतर मार्गावर विस्तार होत आहे. चांगले उत्पन्न देणाऱ्या अर्थात प्रवाशांचा प्रतिसाद असणाऱ्या मार्गावर इलेक्ट्रिक बसचा विचार होत असल्याचे लक्षात येते. या बसचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. नाशिक-बोरिवलीसाठी प्रारंभी सहा इलेक्ट्रिक बस उपलब्ध असतील. सकाळी सहापासून प्रत्येक तासाच्या अंतराने बस सोडण्याचे नियोजन आहे. या सर्व बस नाशिक आगारातच मुक्कामी राहणार आहेत. बसला मार्गक्रमण करण्यास लागणारा वेळ आणि प्रवाशांचा प्रतिसाद पाहून इलेक्ट्रिक बसची संख्या १५ पर्यंत विस्तारण्याची तयारी केली जात आहे. इतर मार्गावर त्या चालविण्याचा विचार केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नाशिक : अन्न औषध प्रशासनाला लवकरच मनुष्यबळ उपलब्ध, फिरत्या प्रयोगशाळांचाही उपक्रम

नाशिकहून बोरिवलीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मुंबईसाठी रेल्वे आणि बससह अनेक पर्याय आहेत. परंतु, बोरिवलीच्या दिशेने तसा पर्याय नाही. वसईकडे जाणारे प्रवासीही शिवशाही वातानुकुलीत बससेवेचा वापर करतात. नव्या इलेक्ट्रिक बस प्रवाशांना अधिक आकर्षित करतील, असा महामंडळाला विश्वास आहे. शिवाई बसपेक्षा ही नवीन बस वेगळी आहे. नऊ मीटरची ही बस असून २०० किलोमीटर तिची क्षमता आहे. महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही गाड्या जुन्या झाल्या आहेत. यातील वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित ठेवणे अनेकदा जिकिरीचे ठरते. या परिस्थितीत अत्याधुनिक प्रणाली व सोयी सुविधांनीयुक्त इलेक्ट्रिक बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास महामंडळाचे अधिकारी व्यक्त करतात. सप्तश्रृंगी गडावरील घाट मार्गावर इलेक्ट्रिक बसची चाचणी घेण्यात आली आहे. ती यशस्वी झाल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik to borivali msrtc electric bus service to start from wednesday 14 th february css