नाशिक : शारीरिकदृष्ट्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, यासाठी सुविधा उपलब्ध असतात. परंतु, अपंग विद्यार्थ्यांना अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागते. या समस्या लक्षात घेत अपंग विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) संस्थेच्या वतीने राज्यातील पहिले नाट्यगृह नाशिक येथे आकारास येत असून त्यासाठी फ्रान्समधील फॉर व्हिवो फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

बहुविकलांग विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर त्यांना आवश्यक प्रकाश योजना, रंगमंचावर पोहचण्यासाठी रस्ता, व्हीलचेअर यासह अन्य काही गरजा पुरविणे भाग असते. अशा प्रकारच्या त्यांच्या गरजा प्रत्येक ठिकाणी भागविता येतीलच असे नसते. याशिवाय बहुतेक विशेष शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सरावासाठी जागाही नसते. राज्य शासनाच्या वतीने सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विशेष बालकांसाठी घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धांना यामुळेच अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. हे अडथळे पार करण्यासाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड संस्थेच्या वतीने उपाययोजना करण्यास सुरूवात झाली आहे. नाशिक येथे सातपूर भागात संस्थेच्या कार्यालयाच्या आवारात २५० आसन क्षमतेचे अभिनव पध्दतीचे नाट्यगृह आकारास येत आहे. या नाट्यगृहासाठी फ्रान्स येथील फॉर व्हिवो फाऊंडेशनने पुढाकार घेत निधी उपलब्ध करून दिला आहे. साधारणत: दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याने कामास सुरूवात झाली आहे.

हेही वाचा…नाशिक: महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करुन बदनामीची धमकी, सिडकोतील घटना

या अभिवन नाट्यगृहात राज्यातील कुठलीही बहुविकलांग शाळा, महाविद्यालय आपले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करू शकणार आहे. यासाठी वाहन व्यवस्थाही उपलब्ध करून दिली जाईल. नाममात्र शुल्क यासाठी आकारण्यात येईल. नाशिक जिल्ह्यातील बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी हे नाट्यगृह मोफत राहणार आहे.

हेही वाचा…Video: भयानक! ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे पर्यटकांच्या बसला अपघात; प्रवाशाच्या मोबाईलमध्ये धक्कादायक दृश्य कैद!

अडीचशे आसनक्षमतेचे नाट्यगृह असून या ठिकाणी उतरंड आणि चढणची व्यवस्था, व्हीलचेअर, बहुविकलांग बालकांच्या गरजा लक्षात घेता रंगमंचाची रचना, आसन, स्वच्छतागृह आदी व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय अत्याधुनिक ध्वनी, प्रकाश योजना असेल. शासनाला नाट्य स्पर्धा या ठिकाणी घेता येतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. अपंग बालकांना सांस्कृतिक व्यासपीठ मिळावे यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. – मुक्तेश्वर मुनशेट्टीवार (पदाधिकारी, नॅब, नाशिक)

Story img Loader