नाशिक : महानगरपालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी बाहेरील राज्यात काय नवीन शैक्षणिक प्रयोग सुरू आहेत, याची पाहणी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी .टी .पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिल्ली येथील मॉडेल स्कुल शाळांची पाहणी केली. त्या ठिकाणी राबवले जाणारे उपक्रम नाशिक महानगरपालिकेत राबवले जाऊ शकतात का, या अनुषंगाने शिष्टमंडळाने अहवाल तयार केला असून विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम , महापालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांना अहवाल सादर केला जाणार आहे.
अभ्यास दौऱ्यात दिल्ली येथील राजकीय सर्वोदय बाल सदन, डॉ. बी. आर. आंबेडकर स्कुल ऑफ एक्सलन्स, दिल्ली व्हर्च्युअल स्कुल अशा शाळांना भेट देण्यात आली. तेथील शिक्षण पद्धत, भौतिक सुविधा, पालकांचा सहभाग, शिक्षकांना दिले जाणारे प्रशिक्षण, मुख्याध्यापकांचे सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे सहशालेय उपक्रम, विविध स्पर्धांचे आयोजन, स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग, शालेय वेळ तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अध्ययन आणि अध्यापनामध्ये प्रभावी वापर कसा केला जातो, त्या अनुषंगाने तंत्रस्नेही शिक्षकांचा सहभाग याबाबत शिष्टमंडळाने माहिती घेतली. शिष्टमंडळाने दिल्ली येथील शिक्षण उपसंचालक सी. एस. वर्मा यांची भेट घेऊन नाशिक महानगरपालिकेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कोणकोणत्या पद्धतींचा अवलंब केला जाऊ शकतो, याविषयी चर्चा केली. दिल्ली मॉडेल स्कुलमध्ये सुरुवातीला कोणकोणत्या अडीअडचणी आल्या, त्यावर कोणकोणते उपाय काढण्यात आले, हेही शिष्टमंडळाने जाणून घेतले.
हेही वाचा…नाशिकच्या नगर भूमापन अधिकाऱ्याविरुध्द १० लाखाची लाच मागितल्याने गुन्हा
दिल्लीतील शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक कोणत्या गटातील आहेत, शाळेकडून पालकांच्या काय अपेक्षा आहेत, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देण्यात येणारे शिक्षण, त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना, शालेय पोषण आहार, विद्यार्थी लाभाच्या योजना, यांचा सखोल अभ्यास शिष्टमंडळाने केला.
हेही वाचा…नाशिक : टोमॅटोच्या शेतात गांजा शेती, वणी पोलिसांकडून ४२ लाखांची झाडे जप्त
दिल्ली मॉडेल स्कुलमध्ये शिक्षकांची भूमिका, तेथील शिक्षक संघटनांशी शालेय व शिक्षण विभागाशी असलेला समन्वय याबाबत चर्चा करून माहिती घेण्यात आली. दिल्ली मॉडेल स्कुलमधील राबवले जाणारे विविध उपक्रम नाशिक महानगरपालिकेमध्ये राबवले जाऊ शकतात का, या अनुषंगाने अभ्यास शिष्टमंडळाने केला असून लवकरच विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम , महापालिका आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांना त्यासंदर्भात सविस्तर अहवाल शिष्टमंडळाकडून सादर केला जाणार आहे.