मनमाड : इंधन कंपन्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या पानेवाडी आणि हिसवाळ या स्थानकांतून देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर रेल्वे टँकरमधून पेट्रोल आणि डिझेल भरून पाठविले जाते. दररोज हजारो लिटरची वाहतूक होणाऱ्या या स्थानकांवरून इंधन चोरी रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीवरून स्थानकात सर्व बाजूने आता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

मनमाडनजीक पानेवाडी येथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या तुर्भे (मुंबई) येथून २५२ किलोमीटरच्या आयएफसी वाहिनीद्वारे इंधन आणून साठविले जाते. ते बीपीसीएल, आयओसी, एचपी या कंपन्यांच्या केंद्रातून राज्यासह देशाच्या विविध भागात रस्ता तसेच रेल्वे टँकरमधून वितरीत केले जाते. पानेवाडीच्या केंद्रातून रेल्वे रॅकमधील टँकरमध्ये इंधन भरल्यानंतर बराच काळ ते रेल्वे रॅक पानेवाडी आणि हिसवाळ स्थानकावर वाहतुकीच्या प्रतिक्षेत उभे करून ठेवले जातात. दरम्यानच्या काळात परिसरात मोठ्या प्रमाणावर पेट्रोल आणि डिझेल चोऱ्या होतात. अनेकदा कारण नसतांना याबाबत ग्रामस्थांवर आरोप होतात. शंका घेतली जाते. यामुळे ग्रामस्थांनाही मोठ्या प्रमाणात मनःस्ताप होतो.

अलीकडेच पानेवाडी येथे इंधन चोरीची मोठी साखळी पोलिसांनी उघडकीस आणली होती. त्यालगत हिसवाळ स्थानक आहे. या इंधन चोऱ्यांविरूध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हिसवाळचे सरपंच कैलास फुलमाळी, उपसरपंच संजय आहेर यांनी मनमाड रेल्वे पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाव्दारे या चोरीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यासाठी या स्थानकात दोन्ही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, म्हणजे चोऱ्यांना आळा बसेल, अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत रेल्वे पोलिसांनी हिसवाळ रेल्वे स्थानक परिसरात तातडीने सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे स्थानकात अप आणि डाऊन दोन्ही बाजूचे भाग, स्थानक परिसर, आत-बाहेर जाण्याचे मार्ग सीसीटीव्हीच्या देखरेखीत येतील. यामुळे रेल्वे हद्दीत घडणारे गुन्हे लवकर उघडकीस येण्यासाठी उपयोग होणार आहे.

इंधन चोऱ्यांना आळा बसून तातडीने चोरांचा तपास लावणे सीसीटीव्ही बसविल्यास शक्य होईल. महेश कुलकर्णी ( प्रभारी अधिकारी, मनमाड रेल्वे पोलीस ठाणे)

सीसीटीव्हीमुळे इंधन चोरीसह इतरही अनेक अप्रिय घटनांना आळा बसेल. ग्रामस्थांना यामुळे दिलासा मिळेल. कैलास फुलमाळी (सरपंच, हिसवाळ)