नाशिक – कळवण तालुक्यातील गायदरपाडा येथे मूलभूत सुविधांअभावी मृत्यू झालेल्या महिलेस मृत्यूनंतरही यातना सहन कराव्या लागल्या. उत्तमा सोनवणे या गायदरपाड्यातील महिलेस आजारी असल्याने रस्त्याअभावी सहा ते सात किलोमीटरपर्यंत लाकडाच्या डोलीतून मळगाव येथे नेण्यात आले. मळगावहून खासगी वाहनाने गुजरातमधील चिंचपाडा स्टेशन येथील रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातच महिलेचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिंचपाडा स्टेशन येथून रात्री ११ वाजता मृतदेह खासगी वाहनाने मळगावपर्यंत आणण्यात आला. तेथून डोलीतून रात्री एकच्या सुमारास जंगलातून व नदी नाल्यातून पायपीट करत मृतदेह गायदरपाडा येथे नेण्यात आला. अशाप्रकारे मृत्यूनंतरही उत्तमा सोनवणे यांना अंत्यविधीपर्यंत असुविधांना तोंड द्यावे लागले.

हेही वाचा – गोदावरी खोऱ्यातील नेत्यांचा नार-पारचे पाणी पळविण्याचा प्रयत्न – गिरणा धरणावरील मेळाव्यात आरोप

हेही वाचा – नाशिक : दीड वर्षानंतर नाशिक जिल्हा टँकरमुक्त – गावांची तहान भागविण्यासाठी ९० कोटींचा खर्च

वास्तविक, गायदरपाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील करंदबारी बारीचे खोदकाम झाले होते. परंतु, पावसामुळे आजूबाजूचे दगड आणि माती रस्त्यावर आल्याने रस्ता बंद झाला. या संदर्भात सरपंच सुकदेव बागूल यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. परंतु, कोणत्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही. त्या नंतर कळवण येथील प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असता त्यांनी रस्ता मोकळा करण्याचे आदेश देखील दिले. परंतु, त्या नंतरही कार्यवाही झाली नाही. करंदबारीतील दगड, माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली असती तर महिलेचा मृतदेह ट्रॅक्टरच्या सहाय्याने नेता आला असता, असे बागूल यांनी म्हटले आहे. गायदरपाड्यापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास गावाचा विकास होऊ शकेल, असे सरपंच बागूल यांनी नमूद केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik torture even after death due to lack of basic facilities ssb