नाशिक: सिक्कीममध्ये दरड कोसळल्याने नाशिक येथील ३५ ते ४० पर्यटक अडकले असले तरी सर्वजण सुखरूप आहेत. शहरातील विविध पर्यटन संस्थांमार्फत हे पर्यटक सिक्कीमला गेले आहेत. रविवारी सिक्कीममध्ये काही ठिकाणी रस्ता खचला, काही ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे स्थानिक प्रशासनासमोर पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी पर्यटनासाठी नाशिकहून काही पर्यटक गेले आहेत. नाशिक पर्यटन व्यावसायिकांच्या तान या संस्थेचे माजी अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी सर्व पर्यटक सुखरुप असल्याची माहिती दिली.
हेही वाचा : जलवाहिनी फुटल्याने नाशिक शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत
सिक्कीममध्ये रस्ता खचणे, दरड कोसळणे नित्याचे आहे. रविवारी दिवसभर असे प्रकार सुरू होते. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पर्यटकांनी रस्ता बदलला आहे. कलिपोंगमार्गे वाहतूक सुरू आहे. यामुळे जो प्रवास अवघ्या काही तासात होणार होता, त्यासाठी पाच ते सात लागत आहेत. या घटनेत एकाही प्रवाशाला त्रास झालेला नाही. सर्वजण सुखरूप आहेत. काही विमानतळावर तर काही रस्त्यात असून नाशिक येथे लवकरच पोहचतील, असे भालेराव यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याविषयी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे यांनी, सिक्कीममध्ये अडकलेल्या नाशिकच्या पर्यटकांनी अद्याप आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधलेला नसल्याचे नमूद केले.