नाशिक : शहरातील सर्व प्रमुख चौक, रस्ते अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडले असून नागरिक व व्यापाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. थांबे वगळता रिक्षा इतरत्र उभ्या राहत असल्याने त्यात भर पडते. अनधिकृत बांधकामे, रस्ते व्यापणारे फेरीवाले, वाहतुकीत अडथळा ठरणाऱ्या रिक्षा आदींवर गणेशोत्सवापूर्वी कारवाई न झाल्यास सर्व व्यापारी संघटना बंद पुकारतील, असा निर्णय व्यापारी संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.
महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराफ संघटनेचे अध्यक्ष गिरीश नवसे यांच्या पुढाकाराने प्रमुख व्यापारी संघटनांची बैठक नाशिक सराफ संघटनेच्या कार्यालयात झाली. यावेळी फेरीवाला क्षेत्र सोडून इतरत्र अतिक्रमण करणारे फेरीवाले, वाहतुकीस अडथळा करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अतिक्रमणविरोधी कारवाई ही केवळ पक्क्या बांधकामावर न करता फेरीवाले, रिक्षा, अनाधिकृत फलक आदींवर कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक आहे.
गणेशोत्सवापूर्वी सर्व खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. सर्व महत्त्वाच्या चौकात झालेले अतिक्रमण, अनाधिकृत फेरीवाले यांच्याकडून निम्म्याहून अधिक रस्त्यावर ताबा होत आहे. यात रस्त्यात उभ्या केलेल्या रिक्षांची भर पडते. यामुळे व्यापारी आणि नागरिक अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत. यासंदर्भात संबंधित यंत्रणांना निवेदन देण्यात येणार असून या तक्रारीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी दखल घेण्याची विनंती केली जाईल. गणेशोत्सवापूर्वी या प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने स्वेच्छेने बंद करण्यात येईल, असा निर्णय सर्वानुमते बैठकीत घेण्यात आला. वाहनतळ व्यवस्थेला लवकरात लवकर मूर्त स्वरूप द्यावे, याविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीस नाशिक धान्य घाऊक किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, नाशिक क्लॉथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, फुटवेअर असोसिएशनचे संदीप आहेर, बुक सेलर असोसिएशनचे अतुल पवार यांच्यासह अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
© The Indian Express (P) Ltd