नाशिक – मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मंगळवारी शहरातून मराठा आरक्षण शांतता फेरी काढण्यात येणार असल्याने शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
जरांगे यांनी राज्यात ठिकठिकाणी काढलेल्या शांतता फेरीचा समारोप नाशिक येथे मंगळवारी होणार आहे. या फेरीला तपोवनातून सुरुवात होणार असून पंचवटीतील स्वामीनारायण मंदिर चौक-काट्या मारूती चौक- दिंडोरी नाका-पंचवटी कारंजा-मालेगाव स्टँड-रविवार कारंजा-सांगली बँक चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ समारोप होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. फेरीमुळे मार्गावर कोंडी होऊ नये, यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा – विधानसभा निवडणुकीत सावरुन घ्या, अजित पवार यांचे जनसन्मान यात्रेत आवाहन
दरम्यान, स्वामी नारायण चौकापासून ते कन्नमवार पूल, मिर्ची सिग्नल ते स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट ते दिंडोरी नाका, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा ते सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल ते सीबीएसच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.
वाहनतळ व्यवस्था
मराठा आरक्षण शांतता फेरीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजबांधव येणार आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या वाहनांसाठी पंचवटीतील निलगिरी बाग, दिंडोरीकडून येणाऱ्या वाहनांसाठी शरदचंद्र पवार बाजार समिती, घोटी, इगतपुरी, मुंबईकडून येणाऱ्या वाहनांसाठी महामार्ग बस स्थानकाशेजारील मोकळ्या जागेत, डोंगरे मैदान आदी ठिकाणी वाहनतळ करण्यात येणार आहेत.