नाशिक – विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्या काही तासांचा कालावधी शिल्लक असताना जाहीर प्रचाराचा समारोप सोमवारी सायंकाळी झाला. तत्पूर्वी राजकीय पक्ष, उमेदवारांकडून फेरीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उमेदवारांच्या राजकीय शक्तिप्रदर्शनामुळे शहरातील अनेक भागात वाहतूक व्यवस्था कोलमडली. वाहनधारकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले.

सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी थांबली. जाहीर प्रचाराच्या शेवटच्या क्षणापर्यंत नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली या मतदारसंघातील उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या, जातींच्या पदाधिकाऱ्यांची, धर्मगुरूंची भेट घेत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. उमेदवारांच्या समर्थकांकडूनही मतदारसंघनिहाय दुचाकी फेरी काढून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. अनेक ठिकाणी उमेदवारांकडून चित्ररथ काढण्यात आले. आपण केलेल्या कामाची माहिती देणारी पत्रके उमेदवारांकडून वाटण्यात आली. उमेदवार तसेच राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांच्या नाश्ता, जेवणाची तसेच येण्या जाण्याची व्यवस्था केली गेली.

हेही वाचा – ११० पोलीस वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरे; मद्य, गुटखा, शस्त्रास्त्रे जप्त

शहरात वेगवेगळ्या ठिकाणांहून निघालेल्या उमेदवारांच्या फेऱ्यांमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक विभागाच्या वतीने फेऱ्यांमुळे होणारी गर्दी पाहता नियोजन करण्यात आले होते. परंतु, त्यांचे नियोजन कोलमडले. उमेदवारांच्या फेऱ्यांमुळे वाहतूक खोळंबा झाला. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, कामावर जाणाऱ्यांना उशीर झाला. काहींनी द्राविडी प्राणायाम करत इच्छित ठिकाण गाठले. त्यासाठी त्यांना नेहमीपेक्षा अधिक अंतर पार करावे लागले. काहींची कोंडीतून सुटका करुन घेताना दमछाक झाली.

हेही वाचा – आयात राजकीय कार्यकर्त्यांनो, मतदारसंघाबाहेर निघा…;  बाहेरील मंडळींच्या छाननीसाठी शोध मोहीम

वाहतूक नियम धाब्यावर

राजकीय पक्षाच्या उमेदवाराकडून काढण्यात आलेल्या दुचाकी फेरीत वाहतूक नियम धाब्यावर बसविण्यात आले. शहर परिसरात वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पोलिसांनी हतबल होत केवळ बघ्याची भूमिका घेतली. वाहनांच्या माध्यमातून काढलेल्या फेरीत दुचाकीवर तीनपेक्षा अधिक जण स्वार, हेल्मेट नसणे, कर्णकर्कश भोंगे वारंवार वाजविणे, आवाजाचा दणदणाट, पायी फेरीत वाहतुकीला अडथळा येईल, अशी कृती समर्थकांकडून सुरू राहिली.

Story img Loader