नाशिक : इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो येथील एकलव्य मॉडेल निवासी शाळेत मी इयत्ता नववीत शिक्षण घेते. चांगले शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे, अशी भावना कावनई येथील भारती रण या कातकरी समाजातील विद्यार्थिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीव्दारे संवादात मांडली. यावेळी मोदी यांनी तिच्याशी मराठी आणि हिंदीत संवाद साधून शाळेतील सोयी-सुविधांची माहिती घेतली. आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करता यावे म्हणून एकलव्य मॉडेल निवासी शाळांची संख्या सरकार वेगाने विस्तारत असून मुलांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोदी यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रधानमंत्री जन मन कार्यक्रमाअंतर्गत मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सोमवारी इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील इयत्ता नववीत शिक्षण घेणारी भारती आणि तिचा भाऊ भाऊसाहेब रण यांच्याशी संवाद साधला. हे भावंड कातकरी आदिवासींमधील कातकरी समाजातील आहेत. यावेळी मोदी यांनी भारतीला वेगवेगळे प्रश्न विचारले. शाळेत काय सुविधा आहेत, शाळा ते गाव किती अंतर आहे, सुट्टीच्या दिवशी घरी जाते का, आई-वडिलांची आठवण येत नाही का, तुझे स्वप्न काय, या प्रश्नांना भारतीने आत्मविश्वासपूर्वक उत्तरे दिली. भारतीने आपणास आयएएस अधिकारी बनायचे आहे, असे सांगितल्यावर मोदी यांनी, मग आम्हाला तुला सलाम करावा लागेल, असे मिश्किलपणे नमूद केले.

हेही वाचा : नाशिक – कांदा निर्यातबंदी करणाऱ्यांविरोधात मतदान बंदी

पंतप्रधानांनी, इतका मोठा विचार मनांत कसा आला, याविषयी विचारणा केली. आपल्या भावाने एकलव्य शाळेत शिक्षण घेतले. तो आता आश्रमशाळेत मुलांना शिकवतो. त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगल्याचे भारतीने सांगितले. शाळा आणि गाव अंतर १५ किलोमीटरचे आहे. आई-वडिलांची आठवण येते. मात्र प्रत्येक आठवड्यात घरी जाणे शक्य होत नाही. शाळेतील शिक्षक चांगले असून मुलांना समजून घेतात. शाळेत मैदान आहे. वसतिगृहात वास्तव्य करते. याठिकाणी भोजनही चांगले मिळते, असे तिने नमूद केले. इतके चांगले हिंदी कसे बोलता येते, या पंतप्रधान मोदी यांच्या प्रश्नावर तिने त्याचे श्रेयही शालेय शिक्षकांना दिले. घरात भाऊ-बहिणीचा वाद झाल्यावर कोण जिंकते, या प्रश्नावर भारतीने भाऊ माघार घेत असल्यामुळे आपणच नेहमी जिंकतो, असे हसत उत्तर दिले. कावनई गावातील दोन ते तीन मुले एकलव्य शाळेत शिक्षण घेत असल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा : जळगावात आदिवासी कोळी समाजाचे झाडाला लटकून आंदोलन

मोदी यांनी भारतीचा भाऊ भाऊसाहेब रण यांच्याशी संवाद साधताना शिक्षणासाठी तुम्ही गावातील किती मुलांना प्रेरणा दिली, केंद्र सरकारच्या कोणत्या योजनांचा लाभ मिळाला, याची माहिती घेतली. समाजासाठी तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे, या प्रश्नावर भाऊसाहेब यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करून मोठे अधिकारी बनवायचे असल्याचे सांगितले. उभयतांनी आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत. मुलांना स्वप्न पूर्ण करता यावीत म्हणून एकलव्य विद्यालयांची संख्या जलदपणे वाढवली जात असल्याचे मोदी यांनी सांगितले.कावनई येथे या कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खा. हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : जानेवारीच्या मध्यावर गारवा, नाशिकमध्ये ११.१ नीचांकी तापमानाची नोंद

स्वच्छता मोहिमेचा पुनरुच्चार

नाशिक येथील काळाराम मंदिरातील स्वच्छता मोहिमेतून आपणास स्वच्छतेचा संदेश द्यायचा होता. मकरसंक्रांतीपासून २२ जानेवारीपर्यंत देशातील सर्व मंदिरातील स्वच्छता करायला हवी. गावांमधील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांनी या मोहिमेत उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik tribal school student said to pm narendra modi that i want to become an ias officer css