नाशिक – राज्य उत्पादन शुल्कच्या वाहनास अपघात घडवून कर्मचाऱ्यास जीवे मारून पसार झालेल्या दारू तस्करांना अटक करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
सात जुलैच्या रात्री गुजरातचा परवाना असलेली आठ ते १० वाहने सिल्व्हासाहून अवैधरित्या दारू घेऊन निघाली असून नवापूर, नवसारीकडे मुंबई-आग्रा महामार्गाने जाणार असल्याची प्राथमिक माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागास प्राप्त झाली. भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशिक येथे गरवारे पॉइंट, द्वारका आणि आडगाव या ठिकाणी सापळा लावला. संशयित मोटार आल्यावर थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोटार न थांबता छत्रपती संभाजीनगर रस्त्याने निफाडकडे भधाव निघून गेले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने संशयित मोटारीविषयी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नाकाबंदी असतानाही पोलीस कर्मचाऱ्यांवर मोटार घालण्यात आली. त्यात चांदवड पोलीस ठाण्यातील दोन अंमलदार जखमी तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मोटार चालकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली. तपासात संशयित गुजरात परिसरात असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा – सिन्नर औद्योगिक वसाहतीत ३१४ किलो भेसळयुक्त पनीरसाठा जप्त
संशयित मोटारीचा चालक देवेश पटेल (३७, रा. गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. सिल्व्हासाहून आठ ते १० वाहने अवैधरित्या दारू वाहतूक करतात. त्यापैकी एक वाहन संशयित अश्पाक शेख (२२, रा. नवसारी) हा घेवून जात असल्याने त्यास आणि त्याच्याकडील वाहन ताब्यात घेतले. चांदवड पोलीस ठाण्यात देवेश आणि अश्पाक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध दारू कोणाकडून आणली, त्यामागील सूत्रधार तसेच अवैध दारू वाहतूक करणारे इतर चालक व वाहनांचा तपास चालू असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी दिली