नाशिक – शहरात बनावट नोटा बाळगणाऱ्या दोन महिलांना गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बनावट १० हजार रुपये जप्त करण्यात आले.
अंबड परिसरातील बनावट नोटा प्रकरण समोर असताना उपनगर परिसरात बनावट नोटा बाळगणाऱ्या पूजा कहाणे (रा. जेलरोड) यांना स्वाती अहिरे या महिलेने काही दिवसांपूर्वी १० हजार रुपये दिले होते. त्यात ५०० रुपयांच्या २० नोटा दिल्या होत्या. बनावट नोटा देण्यासाठी एक महिला कहाणे हिला भेटण्यासाठी मुक्तीधामच्या मागील बाजूस येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे गुंडाविरोधी पथकातील अंमलदार व गुन्हे शाखा विभाग दोनकडील कर्मचारी यांनी मुक्तीधाम मंदिर परिसरात सापळा रचला असता तेथे पूजा कहाणे कोणाची तरी वाट पहात असल्याचे दिसले. त्या ठिकाणी स्वाती अहिरे आली. स्वातीने पूजाकडे दिलेले पैसे परत मागितले. या बनावट नोटांची माहिती कोणालाही देऊ नको, अशी सूचना केली. पूजाने आपल्याकडील बनावट नोटांची पिशवी स्वातीला दिली.
हेही वाचा – अब्दुल मालिक यांच्यावरील गोळीबारामागे राजकीय षडयंत्र – इम्तियाज जलील यांचा आरोप
दरम्यान, गुंडाविरोधी पथकातील पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी दोन्ही महिलांना अटकाव केला. पिशव्यांची तपासणी केली असता पिशवीत बनावट नोटा असल्याचे उघड झाले. दोन्ही महिलांविरुद्ध उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.