पीडित बालिकेच्या कुटुंबाची व्यथा
ती चारचौघींसारखी वर्गात दंगा करायची.. घरी आईमागे खाऊसाठी पिंगा घालत राहायची..संध्याकाळी कामावरून घरी परतलेल्या काकाकडे चॉकलेटसाठी हट्ट धरायची.. आपल्याला हवी ती वस्तू मिळविण्यासाठी बाबांच्या अंगावर लोळण घ्यायची.. मधल्या वेळेत ताईच्या वहीची पाने फाडत जमेल तशी चित्रे रेखाटायची..त्या चिमुकलीचे भावविश्व एका घटनेने पूर्णत: बदलले. अंधार पडायला लागला की ती आता भेदरते. झोपेत दचकून उठते.. आपल्या सभोवताली काय होत आहे ते कळण्यापलीकडे असलेली ती आणि तिचे कुटुंब या भयावह स्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लोकांची सहानुभूती आणि बघ्यांची गर्दी त्यांना वेदनादायी ठरत आहे. या एकंदर घडामोडींनी खचलेल्या पीडितेच्या पालकांसमोर ‘आता पुढे काय’ हा प्रश्न उभा आहे.
तळेगाव येथील चिमुरडीवरील अत्याचाराचे पडसाद जिल्ह्यत उमटले. सर्वसामान्यांनी या घटनेचा निषेध केला. या घडामोडींची शिक्षा आम्हाला का, असा प्रश्न करत पीडितेचे बाबा नाराजी व्यक्त करतात. ज्यांच्यावर हे सर्व काही बेतले, ते कुटुंब त्या एका घटनेने हरविलेली चिमुकलीची निरागसता जपण्याची धडपड करत आहे. वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न करताच त्यांची अस्वस्थता, यातून बाहेर पडण्याची धडपड जाणवते. ही घटना घडली आणि तिला भेटण्यासाठी रीघ लागली. बघ्यांची गर्दी झाली. एकीकडे प्रश्नांची सरबत्ती सुरू असतांना काचेच्या बंद दरवाजाच्या पलीकडून तिचे निरागस डोळे बाबा मला घ्या ना.. असे खुणावत राहिले. दुसरी मुलगी विचारते, बाबा हे सगळे आपल्याकडे का येतात? छकुलीला घरी कधी घेऊन जायचे? त्या भाबडीच्या प्रश्नाला काय उत्तर देणार. त्या क्षणाला ठरवलं बस्स, हे सर्व आपल्यापुरते मर्यादित ठेवायचे. याची झळ आपले कुटुंब, चिमुकल्यांना नको.. यामुळे सरकारी अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी सोडले तर कोणी तिला भेटावे अशी आमची इच्छा नाही. तिच्यासोबत जे घडले ते घडले.. मला त्याचे भांडवल करायचे नाही..या एका घटनेने आमची कोणतीही चूक नसताना जो क्लेश व मनस्ताप सहन करावा लागला तो पुरे झाला. त्याची शिक्षा, त्याचे परिणाम माझ्या छकुलीने का भोगायचे, हा त्यांचा प्रश्न समोरच्याला निरुत्तर करतो.
आज त्या घटनेला ११ दिवस लोटले. त्या क्षणापासून आम्ही नवरा-बायको आणि आमच्या मुली दिवसरात्र सोबतच आहोत. पण आमच्यात एकवाक्याचाही संवाद नाही. पत्नी या संपूर्ण प्रकरणामुळे हादरून गेली. चिमुकलीला तर समजतच नाही, तिच्यासोबत काय होतं आणि काय नाही. दुसरीत शिकणारी थोरली मुलगी समंजस असली तरी तिच्या प्रश्नांची उत्तरे आम्हालाही देता येत नाहीत.. आमचा कोणावर राग नाही. पण आम्हाला कोणाची सहानुभूती नको आणि मदतही नको.. कारण पुढे हाच समाज मुलीच्या मदतीचा उल्लेख करेल.. सरकार जी मदत करेल किंवा अन्य कोणी ती किती दिवस पुरणार.? शासकीय योजनेतून महिला आयोगाने मदत दिली. ती खात्यावर जमाही झाली असेल. पण आम्हीच त्या संदर्भातील कागदपत्रे दिली नसल्याचे तिचे बाबा सांगतात. आम्हाला मदत नकोय तर तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हायला हवी आहे. तिला या सगळ्या वातावरणातून बाहेर काढायचे आहे.. अभ्यासात ती खूप हुशार आहे, थोडीशी तापट आहे.. खेळकर पण तितकीच.. हे सांगताना त्यांचे डोळे भरून आले. मला बोलता येत नाही किंवा रडताही येत नाही. आम्ही साधी माणसे. आजपर्यंत कधी पोलीस ठाण्याची पायरी चढलो नव्हतो. पण या एका घटनेने जे कधी पाहिले नाही ते ११ दिवसांत दिसले. लहान काकाचा चिमुकलीवर खूप जीव. पण तो तिला पाहून हमसून हमसून रडतोय. बाकीच्या नातेवाईकांचे तसेच. त्यामुळे केवळ मी आणि तिची आई, मुलगी आम्ही या ठिकाणी आहोत. मुलीवरचे उपचार झाले की, आम्ही बाहेर पडणार. पण घरी गेलो तर पुन्हा प्रश्नांचा भडिमार.. नको त्या चौकशा.. पुन्हा सुरुवातीपासून तेच आणि तेच.. यातून आम्हाला बाहेर पडायचे आहे.. वरकरणी छकुली खूप खेळते. रंगाच्या वह्य़ावर काहीतरी रेखाटत राहते. गाणी म्हणते पण एकदा अंधार पडला की.. तिचे भेदरणे. दचकून उठणं.. मनाला अस्वस्थ करून जाते. तिची आई तिला कवटाळत फक्त रडत रहाते. त्या दोघींना शांत कसे करायचं. थोरली हे पाहून अधिकच बिथरते.. त्यामुळे तिला रुग्णालयात राहू देत नाही. रात्री केवळ आम्ही तिघे आणि सभोवतालचं वातावण. मानसोपचारतज्ज्ञ येतात.. तिच्याशी गप्पा करतात. खेळणी देतात.. त्यामुळे ती शांत होते. पण हे कुठेतरी थांबायला हवं. आधीची ती आम्हाला मिळायला हवी. यासाठी आमचा आटापिटा सुरू आहे.. पण बाहेरची परिस्थिती पाहता पुढे काय, हा प्रश्न आम्हाला अनुत्तरित करतो. पोलीस, वैद्यकीय अधिकारी, माध्यमे सर्वाची मदत मिळाली. पण हे सर्व आमच्यासोबत कुठंपर्यंत राहतील? आम्हाला न्याय हवा. सर्वसामान्य जगणं हवं आहे..ही अपेक्षा व्यक्त करत बाबा चिमुकलीकडे निघून जातात..