Nashik District Vidhan Sabha historic Wins : नाशिक : विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देणाऱ्या नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत अनेकदा निवडून येण्याचे नवनवीन विक्रम प्रस्थापित झाले. छगन भुजबळ, दादा भुसे यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी सलग पाच वेळा निवडून आली तर, भाजपच्या तीन आमदारांनी हॅट्रीक नोंदविली.
विधानसभा निवडणुकीत मालेगाव मध्यचा अपवाद वगळता महायुतीच्या उमेदवारांनी सर्वच मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे सलग २००४ पासून येवला मतदारसंघात विजयी होत आहेत. विरोधकांनी मराठा-ओबीसी वाद पेटवून त्यांना आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला. सलग पाचव्यांदा त्यांनी विजय संपादित केला. नाशिकचे पालकमंत्रीपद भूषविणारे दादा भुसे यांनीही भुजबळांच्या पावलावर पाऊल ठेवले. मालेगाव बाह्य मतदारसंघात ते पाचव्यांदा विजयी झाले. नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममध्ये सीमा हिरे आणि चांदवड मतदारसंघातील डॉ. राहुल आहेर या भाजपच्या उमेदवारांनी सलग तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवत हॅटट्रीक केली.
h
दिंडोरीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ हे देखील सलग तिसऱ्यांदा निवडून आले. सिन्नरमधून सलग दुसऱ्यांदा विजयी झालेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिक कोकाटे यांनी पाचवेळा आमदार बनण्याचा विक्रम केला आहे. २०१४ मध्ये ते एकदा पराभूत झाले होते. उर्वरित सर्व आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत.
हेही वाचा…नाशिकमध्ये कुठे जल्लोष करत झाली गुलालाची उधळण, तर कुठे शुकशुकाट
मालेगाव मध्य निकाल राखीव
मालेगाव मध्य मतदार संघात ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी इस्लाम पार्टीचे आसिफ शेख यांचा अवघ्या ७५ मतांनी पराभव केला आहे. मौलाना यांना एक लाख नऊ हजार ३३२ मते तर, शेख यांना एक लाख नऊ हजार २५७ मते मिळाली आहेत. समाजवादी पार्टीच्या शान-ए- हिंद व काँग्रेसचे एजाज बेग यांना अनुक्रमे नऊ हजार ५८० व सात हजार ५२७ मते मिळाली. मतमोजणीच्या दहाव्या फेरीपर्यंत शेख हे आघाडीवर होते. नंतर कधी शेख तर कधी मौलाना यांना आघाडी असा सापशिडीचा खेळ सुरू राहिला. अखेरच्या २५ व्या फेरीत मौलाना यांनी ७५ मतांची आघाडी घेत शेख यांच्यावर मात केली. प्रतिस्पर्धी उमेदवार शेख यांच्याकडून हरकत घेतली गेल्याने सायंकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर झालेला नव्हता. मात्र लेखी उत्तर दिल्यावर हा निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.