नाशिक – शहरात काही तांत्रिक कामामुळे शनिवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्याचे पडसाद रविवारीही नवीन नाशिकसह काही भागात कायम राहिले. पाणी टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागले. पाणी पुरवठा न झाल्यामुळे नववसाहतींमध्ये टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. टँकरला मागणी वाढल्याने काही ठिकाणी दर वाढविण्याचा प्रकार घडला.

शनिवारी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. याविषयी महापालिकेने पूर्वसूचना दिलेली असल्याने रहिवाशांनी पाणीसाठ्याचे नियोजन केले होते. रविवारी कमी दाबाने पाणी येईल, अशी अपेक्षा असताना सकाळ सत्रात शहर परिसरातील काही भागात पाणी पुरवठा झाला. परंतु, नवीन नाशिकसह अन्य भागात पाणी पुरवठा झाला नाही. रविवारी पाणी पुरवठा होणार नसल्याची पूर्वसूचना नसल्याने नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागले. घरगुती कामांचा खोळंबा झाला. अनेकांनी घरकाम करणाऱ्यांना सुट्टी दिली. बांधकामाच्या ठिकाणीही टँकर मागविण्यात आले.

दुसरीकडे, नववसाहतींमध्ये पिण्यासाठी आणि दररोजच्या वापरासाठी कॉलनी परिसरात टँकर मागविण्यात आले. मागणी वाढल्याने टँकरव्दारे पाणी पुरवठा करणाऱ्यांनी दर वाढवले. ज्यांना टँकर मागविणे परवडण्यासारखी नव्हते, अशांनी बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या नळांवर पाणी भरले. रविवारी अचानक निर्माण झालेल्या पाणी टंचाईविषयी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, अधिकारी संपर्क क्षेत्राबाहेर होते.