नाशिक : पुनर्वसू नक्षत्रात काही विशिष्ट भागात संततधार कोसळत असली तरी अनेक भागात तो रिमझिम पुरताच मर्यादित आहे. शनिवारी सुरगाणा तालुक्यात संततधारेमुळे नाल्याला आलेल्या पुरात महिलेचा मृत्यू झाला. नांदगाव, मनमाडसारख्या भागात २० दिवसांपासून पाऊस नसल्याने शेतीची कामे थंडावली आहेत.
दोन, तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात पाऊस हजेरी लावत आहे. २४ तासात जिल्ह्यात सुरगाणा (२६.४ मिलीमीटर), इगतपुरी (२४.५), त्र्यंबकेश्वर (१६.८), पेठ (१४.४) अशा घाटमाध्यमावरील भागात पावसाने हजेरी लावली. दिंडोरी, कळवण, नाशिक तालुक्यात तुलनेत प्रमाण बरेच कमी होते. इतरत्र शिडकावा झाला. शनिवारी सुरगाणा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे नद्या-नाल्या दुथडी भरून वाहू लागल्या. सोनगीर येथील कमाबाई तुळशीराम भोये (६०) यांचा नाल्याला अकस्मात आलेल्या पुरात वाहून मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. याच तालुक्यात दोडीपाडा येथे शिवाजी चौधरी यांच्या घराचे नुकसान झाले.
हेही वाचा…मनमाड : कंटेनर बंद पडल्याने इंदूर-पुणे मार्गावर १० तास कोंडी
पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा
मृग नक्षत्र संपले, आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले. त्यामुळे शुक्रवारपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्राकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मनमाड आणि परिसरात २० ते २२ दिवसांपासून पावसात खंड पडल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेतीची कामेही थांबली. ग्रामीण भागात पावसाने उघडीप दिल्याने कुठे पेरणी झाली. तर अन्य ठिकाणी पेरण्या खोळबंल्या आहेत. त्यामुळे दमदार पावसाच्या प्रतिक्षेत बळीराजा आहे. पुनर्वसूच्या पहिल्याच दिवशी पाऊस हजेरी लावेल, अशी अपेक्षा होती. पाऊस रुसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने अनेकांनी मशागतीची कामे आटोपून पेरणी केली. काहींनी बियाणे खरेदी करून ठेवले आहेत,. दमदार पावसाची अनेक भागात प्रतिक्षा केली जात आहे.