नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून पाच दिवसांचे बाळ चोरणाऱ्या महिलेला अवघ्या १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. मूल होत नसल्याने हे कृत्य केल्याची कबुली संबंधित उच्चशिक्षित महिलेने पोलिसांकडे दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा रुग्णालयात अब्दुल खान (रा. ठेंगोडा, नाशिक) यांची पत्नी दाखल आहे. या महिलेचे पाच दिवसांचे बाळ एका महिलेने पळवले. या संदर्भात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्यावर उपायुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेची पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केले. गुन्हे शाखा विभाग एकच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी केली. संशयित महिला धुळे येथील राहणारी असल्याची माहिती मिळाली. परंतु, तिच्या नातेवाईकांना या प्रकाराविषयी कोणतीच माहिती नसल्याचे उघड झाले. लहान बाळाला घेऊन जाणाऱ्या महिलेची चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात आल्यावर एका व्यक्तीने संबंधित महिला दिंडोरी येथे गेल्याची माहिती दिली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि सहकाऱ्यांना संशयित महिला कादवानगर येथील ग्रीनसिटी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. संबंधित ठिकाणाहून ३५ वर्षांच्या संशयित महिलेला बाळासह ताब्यात घेण्यात आले. चोरीनंतर अवघ्या बारा तासांच्या आत पोलिसांनी बाळ आणि संशयित महिला दोघांना शोधून काढले. संशयित महिला उच्चशिक्षित असून बाळ होत नसल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा…जिल्हा रुग्णालय आवारात महिलेची आत्महत्या

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी करत असताना संशयित महिला बाहेरच्या दिशेने कशी गेली, ती कोणा, कोणाशी बोलत होती, या सर्व माहितीच्या आधारे महिलेला ताब्यात घेतले. ही महिला प्रसुती कक्षातील दोन महिलांशी सातत्याने संवाद साधत होती. दोन दिवसांपासून त्यादृष्टीने तिची टेहळणी सुरू होती. मधुकर कड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik woman who stole five day old baby from district hospital detained within 12 hours sud 02