नाशिक : शहरापासून काहीशा दूर असलेल्या तपोवनातील मैदानावर महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत आयोजित मेळाव्यासाठी पावसाचे सावट असतानाही गर्दी जमविण्याचे शिवधनुष्य जिल्हा प्रशासनाने पेलले. या गर्दीला लोकप्रतिनिधी, विविध आस्थापना, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशासेविका यांनी हातभार लावला असला तरी जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडून पाठ थोपटून घेतली. विशेष म्हणजे पूर्वनियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम उशीरा सुरू होऊनही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अन्य राजकीय मंडळींनी आपल्या शैलीत उपस्थित महिलांची मने जिंकली.
तपोवनातील मैदानावर अभियानातंर्गत झालेल्या कार्यक्रमास महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली. ही गर्दी जमावी, यासाठी राज्य परिवहन महामंडळ, सिटीलिंकच्या ९०० बसेसचा ताफा महिलांची ये-जा करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आला होता. याशिवाय खासगी वाहनांनी येणाऱ्यांसाठी वेगळ्या वाहनतळाची व्यवस्था होती. कार्यक्रमस्थळी पावसाची लक्षात घेता जलरोधक तंबु, हिरवी जाळी, बसण्यासाठी खुर्च्या, अशी व्यवस्था होती.
प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाल्यावर प्रशासनाचे दावे फोल ठरत गेले. लोकप्रतिनिधी किंवा अन्य ठिकाणाहून महिलांना ने-आण करणाऱ्या बस या कार्यक्रम स्थळापासून एक किलोमीटर दूर अंतरावर उभ्या करण्यात आल्या होत्या. बस बरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी ये-जा कशी करायची, यासाठी मार्गदर्शक होते. बसमधून काही पाऊले पुढे गेल्यानंतर या मार्गदर्शकाचा आणि महिलांचा संपर्क खंडित होत गेला. काही महिला समुहाने ये-जा करत असल्याने सावळागोंधळ झाला. मुख्य म्हणजे कार्यक्रमस्थळी पोहचण्यासाठी जिल्ह्याच्या अन्य भागातून आलेल्या महिलांना एक किलोमीटरहून अधिक अंतर कापत कार्यक्रम स्थळ गाठावे लागले. बहुतांश महिलांना वाहनात किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी अल्पोहाराची व्यवस्था होईल, असे सांगण्यात आले होते. काहींच्या हातात दोन पुऱ्या व बटाटा भाजी तर काहींच्या हातात भात, गोड पदार्थ असे पदार्थ आले. काहींना घरातून आणलेल्या शिदोरीवरच समाधान मानावे लागले.
उपस्थित महिलांमध्ये लाडकी बहीण योजनांमधील लाभार्थींची संख्या अधिक होती. बचत गटातील महिला, आशा, अंगणवाडी सेविका यासह अन्य शासकीय आस्थापनांतील महिलांना कार्यक्रमास उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. जिल्ह्यातील १५ तालुक्यातील महिला कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या रंगाची साडी परिधान करण्याची सूचना करण्यात आली होती.
हेही वाचा…लाडक्या बहिणींच्या वाहतुकीमुळे बसेसची कमतरता विद्यार्थी, प्रवाशांचे हाल
कार्यक्रम सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने महिलांनी कार्यक्रमस्थळावरून काढता पाय घेण्यास सुरूवात केली. वाहने वेगवेगळ्या ठिकाणी उभी करण्यात आली होती. ही वाहने शोधणे तसेच आपल्या सहकाऱ्यांना शोधणे, यामध्ये महिलांच्या नाकी नऊ आले. कार्यक्रमास झालेला उशीर पाहता मिळेल त्या बसने मुख्य रस्ता गाठण्याकडे महिलांचा कल असतांना बस चालकांकडून आल्या त्याच बस ने जा, असा सल्ला दिला जात होता. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व वाहने एकाच वेळी वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ होत असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
हेही वाचा…भावना व्यक्त करणाऱ्यांना नजरकैद, नाना पटोले यांची महायुती सरकारवर टीका
फुलांची उधळण
कार्यक्रमाच्या ठिकाणी बेरजेच्या आकाराचा लाल गालिचा अंथरण्यात आला होता. या गालिचाच्या बाजूला स्वयंसेवक महिलांनी मंत्र्यांवर फुलांची उधळण करुन फुलांच्या पायघड्यांचे नियोजन केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्री गालिचावरुन मार्गस्थ होत असतांना मंत्र्यांकडूनही उपस्थित महिलांवर फुलांची उधळण करण्यात आली. महिलांनीही आपल्या लाडक्या भावांना राखी बांधली. एवढ्या गर्दीतही महिलांकडून मुख्यमंत्री, अन्य मंत्र्यांबरोबर सेल्फी काढण्याची धडपड सुरू होती.
© The Indian Express (P) Ltd