नाशिक – मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या युवकाचा पार नदीच्या पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यातील खोबळा दिगरजवळ ही घटना घडली. वसंत मासी (२१) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. भावी आयुष्याचा जोडीदार पाहण्यासाठी वसंत हा खोबळा दिगर येथून नदीपलीकडील गुजरात राज्यातील केळधा येथे दुचाकीने निघाला होता. मुसळधार पावसामुळे नदीची पातळी वाढली होती. दुचाकी भाटी येथे पार नदीच्या तिरावर उभी करून नदी पार करीत असताना पाय घसरल्याने तो पुरात वाहून गेला. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वसंतचा मृतदेह भाटी येथून चार ते पाच किलोमीटर अंतरावर आढळला.
वसंत घरी का परतला नाही, म्हणून वडिलांनी नातेवाईक, मित्रांकडे शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. कोणाची तरी बेवारस दुचाकी भाटी येथे नदीच्या काठावर असल्याचे समजल्यानंतर युवकांनी भ्रमणध्वनी ॲपवर दुचाकीचा क्रमांक टाकून शोध घेतला असता वसंत मासी या नावावर वाहनाची नोंद असल्याचे दिसले. काहीतरी विपरीत घडले असावे म्हणून नदी काठावर तपास केला असता पाच किलोमीटर अंतरावर वांगणपाडा येथे एक अनोळखी मृतदेह आढळला. तो वसंतचा असल्याची खात्री पटली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात आजही मूलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. सुरगाणा तालुक्यातील झगडपाडा, खोकरविहीर, अंबोडे, केळावण, खिरमाणी यासह २५ ते ३० गावांचा संपर्क पावसाळ्यात पुलाअभावी तुटतो. जीवनावश्यक वस्तूंसाठी ही गावे गुजरात राज्यावर अवलंबून असतात. पावसाळ्यात भाजीपाला, दूध उत्पादक जीव मुठीत धरुन पार नदी टायरवर बसून पार करतात. पूल झाल्यास परिसरातील भिवतास धबधबा येथे गुजरात राज्यातील पर्यटकांचा ओघ वाढू शकतो. अनेक वर्षांपासून खिरपाडा ते पाचविहीर दरम्यान महाराष्ट्र-गुजरातला जोडण्यासाठी पूल उभारण्याची मागणी केली जात आहे.