नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातंर्गत सुरगाणा तालुक्यातील काठीपाडा या ग्रुपग्रामपंचायतीची निवड करण्यात आली होती. या ग्रुपग्रामपंचायत जवळील गावांमध्ये मिशन भगीरथ प्रयास उपक्रमातंर्गत मागील वर्षी दोन बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. या बंधाऱ्यांमुळे काठीपाडा गावातील भूजल पातळीत कमालीची वाढ झाल्याने शेती व पूरक व्यवसायांवर सकारात्मक परिणाम झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या वतीने मिशन भगीरथ प्रयास हा उपक्रम २०२२ या वर्षी सुरु करण्यात आला. टंचाईग्रस्त आणि दुष्काळसदृश परिस्थिती असणाऱ्या गावांमधील भूजल पातळी वाढावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे. या उपक्रमातंर्गत काठीपाडाजवळील गावांमध्ये दोन बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. दोन वर्षापूर्वी काठीपाडा गावातून दुभत्या जनावरांचे ५०० लीटर दूध संकलन होत होते. आता ३५०० लीटर दूध संकलन होत आहे. काठीपाडा गावातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय हा भातशेती आहे.पावसाळ्यानंतर सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे शेतात दुबार पीक घेतले जात नव्हते, यामुळे रोजगारासाठी गावातील नागरिक स्थलांतर करीत होते. मिशन भगीरथ प्रयास उपक्रमामुळे गावात भूजल पातळी वाढल्याने आता भातशेती बरोबरच गावकरी टोमॅटो, काकडी, पालेभाज्या यांचे उत्पादन घेत आहेत. यामुळे शेती उद्योगास चालना मिळाली आहे. शेतकऱ्यांना बारमाही काम मिळाल्यामुळे स्थलांतर कमी झाले आहे. हे सर्व भगीरथ प्रयास उपक्रमामुळे शक्य झाल्याचे गावकऱ्यांचे मत आहे.

हेही वाचा : नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र

काठीपाडा ग्रुपग्रामपंचायतीचे सरपंच गोपाळनगर येथील रोहिणी वाघेरे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मिशन भगीरथ प्रयास उपक्रमामुळे भूजल पातळी वाढली. त्यामुळे शेती आणि पूरक व्यवसायांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे, सुरगाणा तालुक्यात अजून बंधारे बांधल्यास पाणी संकट दूर होऊन सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात ३०७ बंधारे पूर्ण

मिशन भगीरथ प्रयास उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात ३०७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असून बंधाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणास मदत होत आहे. या वर्षात मिशन भगीरथ प्रयासच्या माध्यमातून २०० बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे, नागरिकांनी देखील मनरेगा योजनेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आपल्या गावात जलसंधारणाची कामे करावीत.

आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)

Story img Loader