नाशिक : जिल्हा परिषदेत २० संवर्गातील तब्बल १०३८ पदांसाठी राबविल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेत तब्बल ६४ हजारहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वांना माहिती असणाऱ्या आणि गावचा सचिव म्हणून कारभार हाकणाऱ्या ग्रामसेवकांच्या (कंत्राटी) ५० पदांसाठी थोडेथोडके नव्हे तर, तब्बल ११ हजार ७२८ आणि आरोग्य सेवकांच्या (पुरूष) ८५ जागांसाठी सर्वाधिक १७ हजार ५७९ अर्ज प्राप्त झाले आहेत.
राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाभरतीची घोषणा करण्यात आली. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. यामध्ये २० संवर्गातील तब्बल १०३८ पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर १०३८ जागांसाठी तब्बल ६४ हजार ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. पदनिहाय प्राप्त झालेले अर्ज पाहिल्यास प्राप्त झालेल्या एकूण अर्जापैकी जवळपास निम्मे अर्ज हे आरोग्य सेवक (महिला-पुरूष) आणि ग्रामसेवकांच्या पदासाठी आल्याचे दिसून येते.
हेही वाचा : धुळ्यात वाढीव बांधकामास मंजुरीसाठी लाच घेताना अभियंता जाळ्यात
ग्रामसेवक हे सर्वांना ज्ञात असणारे पद आहे. मागील काही वर्षात या पदाला वेगवेगळ्या कारणांनी भलतेच महत्व आले आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण या पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे. त्यामुळे बारावी उत्तीर्ण ते पदव्युत्तर अशा सर्वांनी या पदासाठी अर्ज केल्याचे या विभागाचे निरीक्षण आहे. तशीच अर्हता आरोग्य सेवक पदासाठी आहे. यात पुरुषांच्या एका गटात सर्वाधिक अर्ज असून महिलांच्या पदासाठी ही संख्या बरीच कमी आहे. हंगामी फवारणी क्षेत्र (आरोग्य सेवक, पुरूष) गटातही संख्या तुलनेत कमी आहे.
हेही वाचा : हातभट्टीवर सक्षमपणे छापे घालणाऱ्या पोलिस स्त्रिया!
पदनिहाय अर्ज
कंत्राटी ग्रामसेवक पदे ५० (अर्ज ११७२८), आरोग्य पर्यवेक्षक ३ (९१), आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक-महिला) ५९७ (३९५४), आरोग्य सेवक (पुरुष, ४० टक्के) ८५ पदे ( अर्ज १७५७९), आरोग्य सेवक (पुरुष, ५० टक्के) १२६ (६४८८) औषध निर्माण अधिकारी २० (५०५७), प्रयोगशाळा तंत्रज्ञ १४ (२६०७), विस्तार अधिकारी दोन पद (३३७), विस्तार अधिकारी (शिक्षण) सात (१०४७), वरिष्ठ सहायक तीन (१७७३). पशुधन पर्यवेक्षक २८ (७७४), कनिष्ठ आरेखक दोन (४१), कनिष्ठ लेखा अधिकारी एक (४८), कनिष्ठ सहायक (लेखा) पाच (८६३), कनिष्ठ सहायक (लिपीक) २२ (२६६७), मुख्य सेवीका / पर्यवेक्षिका चार (६७७), कनिष्ठ यांत्रिकी एक (४४), कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ३४ (५२६८), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ३३ (२९४२), लघुलेखक (उच्च श्रेणी) एक (९५) या प्रकारे एकूण १०३८ जागांसाठी ६४ हजार ८० अर्ज प्राप्त झाले आहेत.
हेही वाचा : गिरीश महाजन यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर; धुळ्यात डॉक्टराविरुध्द गुन्हा, वाहनाची तोडफोड
प्रलोभनांपासून दूर रहा…
संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या संस्थेमार्फत राबविली जात असून ती अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होईल. काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी. कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. कोणतीही व्यक्ती परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.