नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अशात सत्यजीत तांबेंना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (MUST) आणि महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबेंना पाठिंबा दिला आहे. त्याबाबतचे पत्रही त्यांनी सत्यजीत तांबेंना दिले आहेत.
हेही वाचा : सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीवर अशोक चव्हाणांचं वक्तव्य; म्हणाले, “माणसं फोडून…”
नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगावमधील सगळ्या पदवीधर मतदारांनी सत्यजीत तांबे यांच्या नावासमोर १ क्रमांक लिहून त्यांना या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून द्यावं, असे आवाहन मस्ट या संघटनेने केले आहे.
हेही वाचा : “शिंदे गटाच्या कागदपत्रांत…”, निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर ठाकरे गटाची प्रतिक्रिया
महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक संघटनेने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “पदवीधरांना उच्चशिक्षित असलेल्या सत्यजीत तांबे यांच्यात समस्यांचे निराकरण करणारा आशेचा किरण दिसत आहे. त्यांच्या विजयात आपलाही खारीचा वाटा असावा या उद्देशाने मी मनिष गावंडे, महाराष्ट्र खासगी शिक्षक संघटनेचा अध्यक्ष म्हणून सत्यजीत तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे. नाशिक विभागातील संघटनेचे पदाधिकारी आणि हितचिंतक, शिक्षक हे सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी निष्ठेने काम करतील.”