आपल्या दीरासोबतच लिव्ह-इनमध्ये राहाणाऱ्या एका महिलेची नाशिकमध्ये निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रियकराने आर्थिक वादातून तिच्यावर ३० वेळा वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून यासंदर्भात आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेचे तिच्या दीरासोबत प्रेमाचे संबंध होते. आरोपी प्रियकर नुकताच तुरुंगातून दोन खुनांच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगून बाहेर आला होता. गंगापूर रोडवरच्या संत कबीर नगर झोपडपट्टीत ही महिला आरोपीसोबत राहात होती.मात्र, त्या दोघांमध्ये आर्थिक वादातून वारंवार भांडणं होत असल्याचं तपासातून समोर आलं आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून हे दोघे संत कबीर नगर झोपडपट्टीत राहात होते.

गुरुवारी सकाळी या दोघांमध्ये पैशांवरूनच कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपीने ३२ वर्षीय महिलेच्या मानेवर, पोटावर आणि गालावर चाकूने ३० ते ३५ वार केले. वर्मी घाव बसल्यामुळे आणि अती रक्तस्त्राव झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाला.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nasik crime news lover killed woman in money conflict pmw