नाशिक: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात देशभरातील सुमारे साडेसात हजार युवक-युवती नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. सलग पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात सहभागी होणाऱ्या युवकांची हॉटेलमध्ये निवास व्यवस्था केली जाणार आहे. निवास व वाहतूक, महोत्सवातील विविध उपक्रमांसाठी आवश्यक ठरणाऱ्या बाबींसाठी इव्हेंट मॅनेजमेंट संस्था नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठीची निविदा प्रसिध्द झाली असून एक-दोन दिवसांत या संस्थेची निवड होईल. प्रशासनाने तयारीला वेग दिला असून मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र आणि राज्य शासनाचा क्रीडा व युवक विभाग, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६ जानेवारी या कालावधीत शहरात होणार आहे. १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल. पाच दिवसीय महोत्सवात देशातील वेगवेगळ्या भागातून साडेसात ते आठ हजार युवक-युवती तसेच त्या त्या राज्यातील क्रीडा विभागाचे अधिकारी व केंद्रीय मंत्रालयातील अधिकारी असे आठ ते नऊ हजार जण सहभागी होण्याचा अंदाज आहे. त्यांच्या निवासाची शहरातील हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येणार असल्याचे क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शहरात १४८ हॉटेल असून त्यांची तितकी निवास क्षमता असल्याचे सर्वेक्षण आधीच करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास शासकीय विश्रामगृह, मुक्त व आरोग्य विद्यापीठाची विश्रामगृहे, मविप्रसह विविध शैक्षणिक संस्थांची वसतिगृहे यांचाही विचार केला जाणार आहे. महोत्सव काळात सहभागींची निवासस्थळ ते विविध कार्यक्रम स्थळ अशी दैनंदिन वाहतूक करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने निवास व वाहतूक व्यवस्थेसाठी निविदा प्रसिध्द केली गेली असून एक-दोन दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा… नाशिक : वाहतूक नियमांचे उल्लंघन, तीनशेहून अधिक वाहनचालकांकडून दंड वसूल

राष्ट्रीय युवा महोत्सवात उद्घाटन सोहळा, नंतर वेगवेगळ्या ठिकाणी लोकनृत्य, लोकगीत, वक्तृत्व, कथा-काव्य लेखन, भित्तीपत्रक, छायाचित्रण, पाककला, हस्तकला, एकांकिका, पथनाट्य आदी स्पर्धां होणार आहेत. याशिवाय महोत्सवांतर्गत प्रत्येक राज्यातील खाद्य संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. या काळात दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. या उपक्रमांसाठी वेगवेगळे स्थळ निश्चित झाले आहेत. संपूर्ण महोत्सवाच्या नियोजनसाठी इव्हेंट मॅनेजमेंट संस्था नियुक्तीसाठी निविदा प्रसिध्द झाली असून ही जबाबदारी लवकरच पात्र ठरणाऱ्या संस्थेकडे सोपविली जाणार आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी शहरात प्रत्यक्ष पाहणी करून सूचना दिल्या होत्या. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महोत्सवाच्या तयारीचा मुंबईत आढावा घेणार आहेत.

दरम्यान, नाशिक जिल्हा हॉटेल व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात १०० ते १२५ च्या आसपास निवास व्यवस्था असणारी हॉटेल आहेत. मागील कुंभमेळ्यात अडीच ते तीन हजार व्यक्तींनी हॉटेलमध्ये वास्तव्य केले होते. मागील काही वर्षात त्यात वाढ होऊन हॉटेलची निवास क्षमता साडेतीन ते चार हजारवर गेल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

साहसी खेळांविषयी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन

युवा महोत्सवात विविध स्पर्धा व उपक्रम पार पडणार असून यंदा यात साहसी खेळांचाही अंतर्भाव झाला आहे. साहसी खेळाच्या स्पर्धा होणार नाहीत. परंतु, महोत्सवात या खेळांविषयी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम जिथे होतील तिथे कृत्रिम भिंत उभारण्याची योजना आहे. नौकानयनशी संबंधित साहसी खेळांचे मार्गदर्शन केटीएचएम महाविद्यालयातील बोट क्लब येथे होईल. याशिवाय, अंजनेरी व पांडवलेणी येथे तज्ज्ञांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन होणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National youth festival boosts hotel business in nashik meeting in the presence of cm eknath shinde dvr