नाशिक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पंचवटीतील तपोवन मैदानात शुक्रवारी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यानिमित्त जाहीर सभा, रोड शो, काळाराम मंदिरात दर्शन आणि गोदाघाटावर आरती असे मोदी यांचे कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान भेट देणाऱ्या रामकुंड परिसराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पाहणी केली. पहिल्या दिवसाच्या या कार्यक्रमापासून १५ जानेवारीपर्यंत शहरात विविध ठिकाणी महोत्सवातील कार्यक्रम होणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आदींची उपस्थिती यावेळी राहणार आहे. महोत्सवानिमित्त १३ ते १५ जानेवारी या कालावधीत सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत समूह तसेच वैयक्तीक नृत्य स्पर्धा महाकवी कालिदास कलामंदिर आणि रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. १४-१५ जानेवारी रोजी सकाळी १० ते ५.३० या वेळेत महात्मा फुले कलादालन सभागृहात छायाचित्र स्पर्धा, कलादालनाच्या सभागृह दोनमध्ये वक्तृत्व आणि अन्य स्पर्धा होतील. उदोजी महाराज संग्रहालयात युवा कलाकारांची भित्तीचित्र स्पर्धा तसेच कथालेखन स्पर्धा होईल. हनुमान नगरातील महायुवा ग्राममध्ये १३ व १४ जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेसहा या वेळेत सुविचार स्पर्धा होईल. या ठिकाणी १५ जानेवारी रोजी युवा मार्गदर्शन होणार असून देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून सायंकाळपर्यंत हनुमान नगरातील महायुवा ग्राम येथे युवा कीर्ती, खाद्य महोत्सव, महाराष्ट्र युवा एस्पो हे अनोखे प्रदर्शन होणार आहे. रात्री या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. १३ ते १५ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ वाजता अंजनेरी, बोट क्लब, चामार लेणी येथे साहसी शिबीर होईल. महायुवा ग्राम येथे या काळात विविध प्रकारांचे खेळ होणार आहेत. नाशिककरांनी या महोत्सवास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हेही वाचा : PM Narendra Modi in Maharashtra : नाशिकमध्ये शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, पोलिसांचा कडक बंदोबस्त
महोत्सवानिमित्त १३ ते १५ जानेवारी या कालावधीत समूह तसेच वैयक्तीक नृत्य स्पर्धा महाकवी कालिदास कलामंदिर आणि रावसाहेब थोरात सभागृहात. १४-१५ जानेवारी रोजी महात्मा फुले कलादालन सभागृहात छायाचित्र स्पर्धा. कलादालनाच्या सभागृह दोनमध्ये वक्तृत्व आणि अन्य स्पर्धा. उदोजी महाराज संग्रहालयात युवा कलाकारांची भित्तीचित्र स्पर्धा तसेच कथालेखन स्पर्धा. हनुमान नगरातील महायुवा ग्राममध्ये १३ व १४ जानेवारी रोजी सुविचार स्पर्धा. शुक्रवारी हनुमान नगरातील महायुवा ग्राम येथे युवा कीर्ती, खाद्य महोत्सव, महाराष्ट्र युवा एक्स्पो. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होतील. १३ ते १५ जानेवारी या कालावधीत अंजनेरी, बोट क्लब, चामार लेणी येथे साहसी शिबीर.