नाशिक: दिंडोरीतील मेळाव्यात प्रारंभी काही महिलांकडून राख्या बांधून घेणे, स्थानिक आमदार नरहरी झिरवळ यांचे प्रास्ताविक आणि त्यानंतर इतर कोणाचेही भाषण न होता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उपस्थितांशी संवाद. युवती, महिला, शेतकरी, दूध उत्पादक, मुस्लीम बांधव, मातंग समाज अशा विविध घटकांसाठी राबविलेल्या योजनांची जंत्री त्यांच्याकडून मांडण्यात आली. झिरवळ यांनी दिंडोरी मतदारसंघाला अजितदादांकडून कसा भरभरून निधी मिळाला, हे कथन केले. जनसन्मान यात्रेचा प्रकाशझोत केवळ आणि केवळ अजित पवार यांच्यावर राहील, याकडे बारकाईने लक्ष दिल्याचे यात्रेच्या पहिल्या दिवशी दिसले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने गुरुवारपासून जनसन्मान यात्रेची सुरुवात दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून झाली. सकाळी ओझर विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आगमन झाले. तिथून रस्त्याने पिंपळगावमार्गे ते दिंडोरीकडे निघाले. ओझर येथे महाविद्यालयीन युवतींनी त्यांचे स्वागत केले. रस्त्यातील वरखेडा, मोहाडी या गावात त्यांच्या स्वागतासाठी महिलावर्ग पुढे होता. फटाक्यांची आतषबाजी करुन औक्षण करण्यात आले. राख्या बांधल्या गेल्या. यात वेळ गेल्याने दिंडोरीतील मेळाव्यात पोहोचण्यास उशीर झाला.
हेही वाचा >>>नाशिक: अनिल महाजन यांच्याविरुध्द एक कोटीच्या अपसंपदेप्रकरणी गुन्हा
मेळाव्यातील व्यासपीठ वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने सजविण्यात आले होते. गुलाबी रंगातील भव्य फलकावर अजितदादांची तशीच भव्य प्रतिमा, त्यासमोर दादांचा वादा – लाभ आणि बळ असा उल्लेख होता. द्राक्ष उत्पादकांशी चर्चा करतानाही जनसन्मान यात्रा शीर्षकाखाली गुलाबी रंगातील फलकावर दादांची तशीच प्रतिमा आणि शेतकऱ्यांना फ्री वीज पुरवठा याकडे ठळकपणे लक्ष वेधले होते. जनसन्मान यात्रेतून अजितदादांची प्रतिमा उजळविण्याचे नियोजन पक्षाने केल्याचे सर्वत्र दिसले.
दिंडोरीतील मेळावा दीड ते दोन तास चालला. याठिकाणी सर्व काही अजितदादाच होते. मेळाव्यास प्रदेशा्ध्यक्ष खा. सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते. परंतु, यातील कुणीही भाषण केले नाही. किंबहुना कार्यक्रमाची रचना तशी केलेली होती. व्यासपीठावर रक्षाबंधनाचा कार्यक्रमही झाला. महिलांच्या एका गटासह आशा सेविकांनीही व्यासपीठावर दादांना राख्या बांधल्या. महिला निवेदकाने दादांनी ओवाळणी आधीच दिल्याचे जाहीरपणे सांगितले. एका पदाधिकाऱ्याने चांदीची तलवार दादांना भेट दिली. अजितदादांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाडकी बहीण योजनेच्या धनादेशाची प्रतिकृती देण्यात आली. निवेदकाच्या सूचनेनुसार उपस्थित महिलांकडून टाळ्या व घोषणा सुरू होत्या.
हेही वाचा >>>अजित पवार यांनी घेतले काळाराम मंदिरात दर्शन
दादांकडून योजनांची जंत्री
अजित पवार यांनी महायुती सरकारने महिला, युवावर्ग, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना आणल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले जात असून योजनेचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत पाठिशी राहणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा हजार कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. या योजनेचे पैसे लवकरच बहिणींच्या खात्यात जमा होतील. हा चुनावी जुमला नाही. तुम्ही साथ दिल्यास या योजना कायमस्वरुपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्ती क्षमतेच्या पंपांचे देयक माफ करण्यात आले. मागील देयके भरण्याची गरज नाही. कुणी वीज जोडणी तोडायला आले तर त्याला अजितदादांकडे पाठवून द्या, असेही त्यांनी सूचित केले. महायुतीत सत्तेत सहभागी झाल्यामुळे सर्व घटकांसाठी योजना राबविणे शक्य झाले. सत्तेत नसतो तर या योजना वा मतदारसंघांना इतका निधी देणे शक्य झाले असते का, असा प्रश्नही त्यांनी केला.
© The Indian Express (P) Ltd