नाशिकचे ग्रामदैवत श्री कालिका मातेच्या नवरात्र यात्रोत्सवास तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या काळात कालिका मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले ठेवणे, भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना यांसह अन्य काही विषयांसंदर्भात लवकरच पोलीस, वाहतूक विभागासह वेगवेगळ्या आस्थापनांची बैठक घेण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, महापालिका आणि मंदिर व्यवस्थापन यांची बैठक झाली. कालिका मंदिरात भाविकांच्या गर्दीचा दिवसेंदिवस वाढणारा ओघ लक्षात घेता यंदाही कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सुरू ठेवण्याचे नियोजन संस्थान व्यवस्थापनाने केले आहे. मंदिर परिसरात भाविकांसाठी जलरोधक मंडप उभारला जाणार असून महिला, पुरुषांसाठी स्वतंत्र रांगा राहणार आहेत. भाविकांना दोन कोटींच्या विमाचे कवच देखील राहणार असल्याची माहिती कालिका मंदिर देवस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांनी दिली.

हेही वाचा >>> नाशिक : जळगावमध्ये लाच स्वीकारताना ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघे जाळ्यात

भाविकांसाठी २४ तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त भाविकांना देवीचे दर्शन सुलभ होण्यासाठी यात्रा कालावधी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच १६ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली. यात्रोत्सव काळात महापालिकेतर्फे प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी सूचनाही करण्यात आली. कालिका मातेच्या नवरात्र उत्सवावर ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ४० पुरुष आणि महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. याशिवाय, महापालिकेकडून देखील सुरक्षारक्षक, मंदिर परिसरात रुग्णवाहिकेची सोय, शंभरहून अधिक स्वयंसेवक, देवांच्या दागिन्यांसाठी विमा कवच, अशा सुविधा राहणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

हेही वाचा >>> बनावट प्रस्ताव कारवाईप्रश्नी नाशिक मनपा-जिल्हा प्रशासनाचे एकमेकांकडे बोट

भक्त निवासात खोल्या वाढविणार

कालिका मंदिर परिसरात भाविकांसाठी सद्यस्थितीत ४० खोल्या असलेले भक्त निवास आहे. भाविकांच्या सोईसाठी आणखी २५ खोल्या वाढविण्यात येणार असून त्यासाठी तीन कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती कालिका मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली. देवस्थान परिसरात यात्रोत्सवात विविध व्यावसायिक दुकाने थाटतात. यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहतूक नियोजन यांसह अन्य काही विषयांवर वाहतूक विभागाबरोबर बैठक घेण्यात येणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri yatra festival of sri kalika mata mandir will start from 3 october zws