राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन समाप्त होण्यापर्यंत निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर शाखेतर्फे गुरुवारी सायंकाळी शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देत काळ्या फिती लावून व खोके दाखवून निदर्शने करण्यात आली. आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
हेही वाचा- जळगावात सत्ताधारी-विरोधकांत आंदोलनासाठी रंगली स्पर्धा; महापालिकेसमोर ठाकरे गट-भाजप समोरासमोर
सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे काम हे घटनाबाह्य असून, शिंदे सरकार सातत्याने हेच करीत असल्याचा आरोप करण्यात आला. गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशनात बोलू नये, शेतकरी, कष्टकरी व सामान्य जनतेचे प्रश्न मांडू नयेत, महापुरुषांच्या अपमानाविरुद्ध बोलू नये आणि बेळगाव सीमावादावरील लक्ष विचलित करण्याच्या हेतूने त्यांना सत्ताधार्यांच्या आग्रहाखातर अधिवेशन समाप्त होईपर्यंत निलंबित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
हेही वाचा- ठाकरे गटाच्या प्रभागनिहाय बैठका तर, शिंदे गटाचा प्रशिक्षण वर्गांवर भर
या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगर शाखेतर्फे शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत काळ्या फिती लावून व खोके दाखवून निदर्शने करण्यात आली. निलंबन मागे न घेतल्यास यापुढे अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी दिला. आंदोलनात युवक महानगराध्यक्ष रिकू चौधरी, महिला आघाडीच्या महानगराध्यक्षा मंगला पाटील, लीलाधर तायडे, अमोल कोल्हे, राजू मोरे, पुरुषोत्तम चौधरी आदीनींही सहभाग घेतला.