Chhagan Bhujbal on ED and BJP: “माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता. ईडीपासून सुटका झाल्याने अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला”, असा दावा छगन भुजबळ यांनी केल्याचे जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात म्हटले गेले आहे. या पुस्तकातील काही उतारे लोकसत्ताने आज बातमीत छापल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच छगन भुजबळ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आता यावर आपली भूमिका मांडली आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात छगन भुजबळ यांच्याशी संबंधित अनेक दावे करण्यात आले आहेत.

“ईडीपासून सुटका करण्यासाठी आम्ही भाजपाबरोबर गेलो, असा आरोप आमच्यावर नेहमीच होत आले आहेत. तसेच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात मला क्लीन चीट मिळाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मला क्लीन चीट मिळाली होती. याबद्दल मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पेढेही दिले होते. आम्ही विकासासाठी भाजपाबरोबर आलो होतो. महायुतीला पाठिंबा देण्यासाठी ५४ लोकांनी स्वाक्षरी केल्या होत्या. त्या सर्वांवर काय ईडीची चौकशी सुरू नव्हती. आम्ही फक्त मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारमध्ये सामील झालो होतो. त्याचा फायदा विकासासाठी आम्हाला झालेला आहे”, असी प्रतिक्रया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

हे वाचा >> भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’

छगन भुजबळ पुढे म्हणाले, “निवडणुकीच्या वेळेलाच हे का छापले जात आहे? याबद्दल मला आश्चर्य वाटते. मी ते पुस्तक वाचलेले नाही. त्यात काय लिहिलेले आहे? हे नंतर पाहीन. आता सध्या माझे लक्ष प्रचारावर आहे. तसेच आमच्या वकिलांशीही मी चर्चा करेन. निवडणुकीनंतर जे जे चुकीचे आहे, त्यावर मी नक्कीच कारवाई करेन. नको नको त्या गोष्टी माझ्या तोंडी घातलेल्या आहेत, त्याला निश्चितच आम्ही उत्तर देऊ.”

शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते

राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील कथित सत्य आढळते. ‘अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते. मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती. हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली’, अशी भावना भुजबळांनी व्यक्त केली.