धुळे – महानगर पालिका ही लोकप्रतिनिधींचे सभागृह आहे. ते कुठल्या पक्षाचे कार्यालय नाही. यामुळे भाजप जिल्हाध्यक्षांनी महानगर पालिकेत आयुक्तांसह अधिकार्यांची घेतलेली बैठक पूर्णपणे बेकायदेशीर आहे. अशा बैठका लोकशाहीसाठी घातक आहेत. आयुक्तांनी नियम, शिष्टाचार पायदळी तुडविले आहेत. पालिकेचे अधिकारी हे जणू काही भाजपचे पदाधिकारी आहेत असे वागत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांनी केली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकांना निवडून दिले आहे.
हेही वाचा >>> नाशिक : गंगापूर रोड परिसरात बिबट्या जेरबंद
आयुक्त आणि सर्व अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. कदाचित अधिकार्यांना याचा विसर पडला असावा, असा टोलाही भोसले यांनी हाणला आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी महानगर पालिकेत प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी यांची बैठक घेतली. एखाद्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बैठक घेणे आणि अधिकार्यांनी बैठकीला उपस्थित राहून उत्तर देणे हे लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. हा चुकीचा पायंडा पडत आहे.
हेही वाचा >>> जिल्ह्यात डोळ्यांची साथ; बालकांमध्ये प्रमाण अधिक
प्रशासकीय अधिकार्यांसाठी काही नियम असतात. आयुक्तासारख्या मुख्य पदावर कार्यरत असणार्या अधिकार्याने असे बैठकीला उपस्थित राहून उत्तर देणे लाजिरवाणे आहे. पालिकेचे अधिकारी हे जणू काही भाजपचे पदाधिकारी असल्यासारखे वागत आहेत. आयुक्त व इतर अधिकार्यांची नियुक्ती ही भाजपनेच केली आहे, असे कदाचित त्यांना वाटत असेल,असा चिमटाही भोसले यांनी काढला. राष्ट्रवादी अशा चुकीच्या पायंडाचा निषेध करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.