राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गलथान कारभारामुळे राज्यात गेल्या १५ वर्षांत एकही सिंचन प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यामुळे राज्यातील दुष्काळी स्थितीला राष्ट्रवादी कॉंग्रेसच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केला. राष्ट्रवादीला दुष्काळावर बोलण्याचा अधिकारच नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.
गेल्या दोन दिवसांपासून राज ठाकरे नाशिक दौऱयावर आहेत. शुक्रवारी एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सत्ता असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकही सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याकडे लक्ष दिले नाही. आता शरद पवार आणि त्यांच्या इतर नेत्यांनी दुष्काळी भागात दौरा करून काय उपयोग आहे, असाही प्रश्न त्यांनी विचारला.
यावेळी राज ठाकरे यांनी राज्यातील सध्याच्या युती सरकारवरही टीका केली. युती सरकारच्या काळात घोषणा खूप झाल्या. पण प्रत्यक्ष काम झालेले कुठेच दिसत नाही. सरकारच्या कामांची घडी अजून नीट बसलेली नाही, असे त्यांनी सांगितले. कुंभमेळ्यातील पहिल्या शाहीस्नानावेळी पोलीसांच्या विविध उपाययोजनांवर सामान्यांना नाराजी व्यक्त केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, पोलीसांनी जे काही केले ते केवळ नागरिकांची सुरक्षितात आणि काळजीपोटी केले. त्यांना त्रास देण्याचा त्यांचा अजिबात हेतू नव्हता.

Story img Loader