नाशिक : महाराष्ट्रात वर्षभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. महिलांची हत्या, लहान बालकांबाबतही असे घडत आहे. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांचा धाक राहिलेला नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या पाटील यांनी पुण्यात युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर भाष्य केले. बस स्थानकात, बसमध्ये असे प्रकार घडणे अतिशय गंभीर बाब आहे. सरकारने याची दखल घेऊन ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. एमएमआरडीएतील कथित लाचखोरीच्या संदर्भाने पाटील यांनी जगातून महाराष्ट्रात येणारी गुंतवणूक दुसऱ्या राज्यांकडे वळत असल्याकडे लक्ष वेधले. राज्यात सगळीकडे सर्रास असे प्रकार सुरू आहेत. गुजरातसह अन्य शेजारील राज्यांमध्ये उद्योजकांना जसे पाठबळ मिळते, तसे महाराष्ट्रातून मिळत नसल्याची गुंतवणूकदारांची तक्रार असते. नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांना विचारणा केल्यास किती अडथळे दूर करावे लागतात, हे लक्षात येईल. शरद पवार गटातून काही माजी आमदार पक्षांतर करणार असल्याच्या वावड्या प्रसारमाध्यमांतून पसरविल्या जातात. सध्या माध्यमे बातम्या तयार करतात. महत्वाची बातमी निष्प्रभ करण्यासाठी असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आपला अनुभव असल्याचे पाटील यांनी सांगितले. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाची नियुक्ती रखडल्यावरून त्यांनी १५ ऑगस्टपर्यंत तरी ही नेमणूक होईल अशी अपेक्षा बाळगुया, असा टोला हाणला.

कृषिमंत्र्यांविरोधात षडयंत्राची साशंकता

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्री, आमदार नसतानाचे शासकीय सदनिकेचे हे प्रकरण आम्हाला माहिती नव्हते. मंत्री झाल्यानंतर ते अकस्मात समोर आले. निकाल विरोधात जाणे आणि मंत्रिपद सोडण्याची वेळ आणणे, हे सगळे कोणीतरी रचत आहे, करत आहे, अशी शंका लोकांना वाटते. कोकाटे यांच्याकडून चूकच झाली आहे. त्याचे समर्थन करत नाही. प्रदीर्घ काळानंतर सत्तेत बसल्यानंतर याचा निकाल आपोआप लागत आहे की कोणीतरी तशी व्यवस्था करत आहे, याविषयी प्रसारमाध्यमांनी संशोधन करावे, असा सल्ला पाटील यांनी दिला.