नाशिक – राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने भारतीय जनता पक्ष, ठाकरे गट आक्रमक झाले आहेत. पवार यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.
नाशिक महानगराच्या वतीने रविवार कारंजा येथे त्यांचा जाहिर निषेध करून त्यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले. विधानसभेत अजित पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्य रक्षक होते अशा पध्दतीचे वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्रात सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहे. ज्या धर्मवीर संभाजी महाराजांनी ४० दिवस अत्याचार सहन केला.
हेही वाचा >>> “आमचे वंशज शिवाजी महाराजांबरोबर लढले, त्यामुळे कोण्या चोमड्याने…”, शिंदे गटातील आमदाराची अजित पवारांवर टीका
अखेर मुत्यृ पत्कारला पण धर्म सोडला नाही अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी पवार यांनी केलेले हे विधान निषेधार्य असल्याने अजित पवार थोडीतरी लाज बाळगा…, धिक्कार असो धिक्कार असो अजित पवारांचा धिक्कार असो….,राजीनामा दया राजीनाम्या दया अजित पवार राजीनामा दया…. अशा घोषणा कार्यकर्त्यानी दिल्या. या आंदोलनाप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, आ.देवयानी फरांदे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, देवदत्त जोशी आदी उपस्थित होते. मुंबई नाका येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. सीमा हिरे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. महिला कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अजित पवार यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.